घरातले म्हणाले-होळीत नको येऊ घरी; सोशल मीडियावर आता चर्चा फक्त 'याच' व्हिडिओची!

मुंबई: सण-उत्सव हे मुळात कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी असतात. होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण, आनंद आणि आप्तस्वकीयांच्या भेटीची वेळ. मात्र, कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या एका तरुणासाठी यंदाची होळी आनंदाऐवजी डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, यात एक तरुण त्याच्या कुटुंबाने त्याला होळीसाठी घरी येऊ नको असे म्हटल्याने हमसून रडताना दिसत आहे. या व्हिडिओने 'पुरुष' या संकल्पनेशी जोडलेल्या पारंपारिक कल्पनांना छेद दिला असून नेटकऱ्यांचेही डोळे पाणावले आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका व्हिडिओ चॅट ॲपवरील संवादाचा भाग आहे. यामध्ये हा तरुण दुसऱ्या एका व्यक्तीशी बोलताना प्रचंड भावूक झालेला दिसतो. संवादादरम्यान जेव्हा होळीच्या सुट्टीचा विषय निघाला, तेव्हा या तरुणाला स्वतःचे अश्रू अनावर झाले. तो हुंदके देत म्हणाला की, त्याचे घर अवघ्या १०० ते १५० किलोमीटर अंतरावर आहे, पण तरीही घरचे त्याला येण्यास नकार देत आहेत. मी काम करतोय यार, असे नाही की मी काहीच करत नाही. पण घरचे सणासुदीला घरी येऊ नको असे का म्हणाले हेच समजत नाहीये, असे सांगताना त्याच्या आवाजातील वेदना स्पष्टपणे जाणवत होती. घरच्यांच्या संमतीशिवाय जाणे त्याला योग्य वाटत नसल्याने तो अधिकच हताश झाला होता.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘पुरुष रडत नाहीत असे कोण म्हणते? कुटुंबासाठी ते सर्व काही करू शकतात,’ असे लिहीले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रियेचा महापूर आला आहे. अनेक युजर्सनी पुरुषांच्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य केले आहे. एका युजरने लिहिले की, स्त्री, मुले आणि पाळीव प्राण्यांवर बिनशर्त प्रेम केले जाते, परंतु पुरुषाला केवळ तो कुटुंबाला काहीतरी देऊ शकतो याच अटीवर प्रेम मिळते. अन्य एकाने 'कहाँ रहते हैं वो लोग जो कहीं के नहीं रहते..' या शायरीच्या ओळी पोस्ट केल्या.
दरम्यान, काही संवेदनशील नेटकऱ्यांनी या तरुणाला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीने तर या तरुणाला आपल्या घरी होळी साजरी करण्यासाठी आमंत्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. या व्हिडिओने समाजातील एका अशा वास्तवावर प्रकाश टाकला आहे, जिथे पुरुषांच्या भावना अनेकदा दडपल्या जातात. सण असूनही घरापासून दूर राहण्याचे दुःख आणि कुटुंबाचा नकार यामुळे हा तरुण पूर्णपणे खचलेला दिसत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय ठरला आहे.