रस्ते अपघातात अपंग, अथंरुणावर खिळून असलेल्या व्यक्तींची होणार नोंद

उत्तर गोवा रस्ता सुरक्षा बैठकीत निर्णय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 mins ago
रस्ते अपघातात अपंग, अथंरुणावर खिळून असलेल्या व्यक्तींची होणार नोंद

पणजीः रस्ते अपघातात (Road Accident) अपंगत्व आलेल्या तसेच अथंरुणावर खिळून असलेल्यांची माहिती एकत्र करण्यात येणार आहे. या व्यक्तींची माहिती मिळाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई, आर्थ‌िक मदत आणि दिव्यांगांचा लाभ देणे सोयीस्कर होणार आहे. या विषयीच्या निर्णयाला उत्तर गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा बैठकीत (North Goa District Road Security Meeting)  मान्यता देण्यात आली. 

अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरूदास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उत्तर गोवा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे सदस्य सचिव जुड कार्व्हालो, लीड एजन्सीचे चेअरमन राजेश नाईक, पोलीस उपअधीक्षक सुदेश वेळीप, अतिरिक्त वाहतूक संचालक बी. एस. सावंत, नगर विकास खात्याचे अतिरिक्त संचालक पंकज राणे, वाहतूक जागृती विभागाचे निरीक्षक सूरज सावंत, नेशनल इन्फोमेटीक्स सेंटरचे विराज बोरकर आणि गोवा कॅनचे समन्वयक रोलन्ड मार्टीन्स उपस्थित होते. 

सध्या रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची माहिती आणि संख्या सरकारकडे आहे. पण अपघातानंतर कोण घरी बसून आहे किंवा अंथरुणाला खिळून आहे, याची आकडेवारी सरकारकडे नाही, असे रोलन्ड मार्टीन्स यांनी बैठकीनंतर सांगितले.

त्यासाठी रस्ते अपघातात गंभीर जखमी होऊन जे व्यक्ती अपंग होतात,  अंथरुणाला ख‌िळून असतात किंवा बेशुद्ध असतात त्यांची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून घेऊन एकत्र करण्यात येणार आहे. या व्यक्तींना ‘हीट अॅंड रन’ अपघात योजना २०२२ खाली नुकसान भरपाई देण्यास मदत होणार आहे. तसेच अपंग झालेल्या व्यक्तींना दिव्यांग कार्ड देऊन त्यांना आवश्यक लाभ मिळणार. सध्या जन्मताच अपंग असलेला व्यक्ती हा दिव्यांग म्हणून समज झाला आहे, अशी माहिती मार्टीन्स यांनी दिली.   

उत्तर गोव्यात मृत्यू आलेल्या अपघातांच्या विश्लेषणाचा पाठपुरावा करणे, दारू पिवून वाहने चालवू नका या पर्यटन खात्याच्या उपक्रमाला पाठिंबा देणे, तसेच मेरशी जंक्शन, अटल सेतू जंक्शन आणि बांबोळी जंक्शनची पाहणी करून रस्ता अभियांत्रिकीतील त्रुटी शोधणे आणि उत्तर गोवा जिल्ह्यात अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय बैठकीत झाला.

बांबोळीतील फुलांच्या खुरीसजवळ ‘फूट ओव्हर ब्रीज’च्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. तसेच पर्वरी उड्डाणपूल बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल मागवण्यात आला. आणि वाहतूक सिग्नल जंक्शनवर कॅमेरा बसवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 









हेही वाचा