गणेशहिल, महालवाडा मडकई येथील श्री महागणपती संस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांनी सढळ हस्ते केलेल्या साहाय्यामुळे प्रथम घुमटी आणि आता भव्य मंदिर बांधून तयार झाले आहे. महागणपती संस्थानच्या प्रवासाविषयी थोडक्यात...

राजेंद्र गंगाराम कारेकर यांच्या म्हार्दोळ येथील ओम साई ज्वेलर्सची स्थापना १९ एप्रिल १९८८ रोजी झाली. दोन वर्षांपासून त्यांच्या नजरेत आले की, दहा ते बारा वर्षांची आठ मुले गणेशोत्सवात भाविकांनी विसर्जित केलेली श्री गणेशाची मूर्ती आणून त्याचे पूजन करत आहेत. एकदा ही मुले देणगी मागण्यासाठी कारेकर यांच्याकडे आली. त्यांनी देणगी दिली.
मुलांच्या इच्छेनुसार घुमटी तयार
अशीच काही वर्षे गेल्यानंतर एका वर्षी या मुलांनी येथे कायमस्वरूपी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करूया. त्यासाठी घुमटी बांधूया, अशी इच्छा कारेकर यांच्यासमोर व्यक्त केली. कारेकर यांनाही ही संकल्पना योग्य वाटली. त्यांच्याच फियाट कारमधून घुमटीसाठी आवश्यक चिरे आणले. बघता बघता घुमटी बांधून तयार झाली.
घुमटीत पाषाणी मूर्तीची प्रतिष्ठापना
या घुमटीत श्री गणेशाची पाषाणी मूर्ती प्रतिष्ठापित करावी, अशी कारेकर यांची इच्छा होती. त्याचवेळी म्हार्दोळ येथील श्री महालसा मंदिराच्या मंडपाचे काम सुरू होते. तेथील कारागिराकडून पाषाणी श्री गणेशमूर्ती तयार करून घेतली. १० सप्टेंबर १९८१ रोजी तिची प्रतिष्ठापना करण्यात आली.
निर्जन जागेत चैतन्य भरणे
बालगोपाळांच्या आग्रहामुळेच मूर्ती स्थापन झाली. नंतरही त्या आठ मुलांनी देवाची सेवा अखंडित घडावी यासाठी मंगळवार वाटून घेतले. श्री गणेशचतुर्थीही नऊ दिवस साजरी करण्याचे ठरविण्यात आले. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजा आणि मनोरंजनासाठी एखादा नाट्यप्रयोग यांचे आयोजन करण्याचे ठरले. ही परंपरा आजतागायत सुरू आहे. घुमटी असलेली जागा निर्जन असल्याने भीती निर्माण करणारी होती. मात्र श्री गणेशमूर्तीच्या स्थापनेमुळे या जागेला चैतन्य प्राप्त झाले.
पुजाऱ्याची विनामोबदला सेवा
नित्य देवपूजेसाठी पुजारी ठेवण्याचे ठरविले. या पुजाऱ्यानेही कोणताही मोबदला न घेता नित्य पूजा करण्याचा मनोदय व्यक्त केला. ‘या सेवेबद्दल त्यांनी मोबदला घ्यावा. हवे असेल तर ते हे पैसे फंडपेटीत जमा करू शकतात’, असा सल्ला कारेकर यांनी त्यांना दिला. आज हे पुजारीकाका श्री गणरायाच्या सेवेमुळे तृप्त व समाधानी आहेत.
भाविकांच्या साहाय्यामुळे देऊळ साकारले
घुमटीचे व्यवस्थापन पहाणाऱ्या सदस्यांची संख्या वाढून २८ वर पोहोचली. दर्शनासाठी येणारे भाविक व श्रद्धाळूही वाढू लागले. २ फेब्रुवारी २०२० रोजी, श्री गणेश जयंती दिवशी २८ सदस्य रात्री कारेकर यांच्या घरी आले. त्यांनी ‘देऊळ कधी बांधूया ?’ असा प्रश्न केला. थोडा वेळ विचार करून ‘देऊळ नाही निदान गर्भकुडी तरी बांधू’, असे आश्वासन कारेकर यांनी त्यांना दिले. बांधकाम व्यवसायातील अभियंते, आर्किटेक्ट यांचा सल्ला घेतला. त्यांनी कुडीऐवजी देऊळ बांधूया, असा सल्ला दिला. आश्चर्य म्हणजे ध्यानी मनी नसताना अचानक देणगीचा ओघ वाढला. कुणापुढे हात पसरायची गरजच भासली नाही.
पाच फुटी सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना
एक विचार आला की, मडकईत सातवाडे आहेत. या पवित्र कार्यात प्रत्येक वाड्यावरील लोकांचा सहभाग असावा, यासाठी वाड्यावर फिरून देणगी गोळा केली. २८ सदस्यांच्या अर्धांगिनींनी स्वखर्चाने दीपस्तंभ व तुळशीवृंदावन बांधले. महेश चोडणकर यांच्याकडे मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकाराची विचारपूस केली. त्यांनी करमळी येथील युवा मूर्तिकार महेश भोमकर यांचे नाव सुचविले. या मूर्तिकाराने सुबक, सुंदर, आकर्षक. अशी पाच फुटी श्री गणेशमूर्ती तयार करून दिली.
ट्रस्टींमध्ये मनभेद कधीच नाहीत
अठ्ठावीस सदस्यांचा सहभाग असलेले श्री महागणपती संस्थान ट्रस्ट स्थापन झाले. स्थापनेनंतर प्रत्येक मंगळवार २८ सदस्य साजरा करतील व पुढील सेवा करण्याची संधी इच्छुक भाविकांना द्यावी, असा नियम करण्यात आला. सर्व गोष्टी विघ्नहर्ता गणरायाने प्रत्येकाच्या हातून करून घेतल्या. योगायोग असा की १० सप्टेंबर १९९१ रोजी जुन्या मूर्तीची स्थापना झाली होती व १० सप्टेंबर रोजीच श्री महागणपतीच्या नूतन मूर्तीची स्थिर प्राणप्रतिष्ठा व शिखर कलश स्थापना झाली. २८ ट्रस्टींमध्ये वादविवाद, मतभेद असतात; परंतु मनभेद कधीच झाला नाही. यापुढेही कधीही होणार नाही. सर्व मंडळी एकजुटीने व एक दिलाने कार्यरत असतात.
राजेंद्र गंगाराम कारेकर
अध्यक्ष, श्री महागणपती संस्थान ट्रस्ट, महालवाडा, मडकई.