
पणजी: काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देशभरात सर्वत्र 'संघटन सृजन अभियान' सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून गोव्यात काँग्रेस प्रशासनाच्या म्हादई जिल्हाध्यक्षांसाठी तीन जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मंगलदास नाईक, प्रणव परब आणि सुबोध आमोणकर यांचा समावेश आहे. पुढील पंधरा दिवसांत जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे अभियानाचे गोवा निरीक्षक डॉ. रामचंद्र कुंतीया यांनी सांगितले. शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कुंतीया यांनी सांगितले की, जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी आम्ही तळागाळातील कार्यकर्त्यांशी तसेच गट व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. वरील तीन नावे केंद्रीय पातळीवर पाठवली जातील. या निवडीमध्ये स्थानिक नेत्यांची शिफारस घेण्यात आलेली नाही; त्यामुळे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. नियुक्त झालेल्या अध्यक्षांनी सहा महिन्यांत चांगले काम करून दाखवणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना पदावरून हटवण्यात येईल.
ते म्हणाले की, पक्षाने ही मोहीम अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सुरू केली आहे. नवीन जिल्हाध्यक्षांना पूर्वीपेक्षा अधिक अधिकार देण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या गट आणि नगरपालिका समिती निवडीत त्यांना सहभागी करून घेतले जाईल. गट समितीचे अधिकारदेखील वाढवण्यात येणार आहेत. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारा युवा वर्ग पक्षात सक्रिय होण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. याद्वारे आम्ही भाजपच्या धर्मांध राजकारणाला समर्थपणे तोंड देणारी फळी उभी करत आहोत.