‘नशा मुक्त भारत’ कार्यक्रमात मुख्यमंत्री

पणजी : गोव्यात (Goa) जप्त करण्यात येणारे अमली पदार्थ (Drugs) केवळ ताब्यात घेतले जात नाहीत, तर ते कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्टही केले जातात. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली नष्ट करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (ANC) केले जाते व त्यातून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित होत असल्याचे असल्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
समाज कल्याण खात्यातर्फे आयोजित केलेल्या ‘नशा मुक्त भारत’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, “सरकारची भूमिका केवळ अमली पदार्थ जप्त करण्यापुरती मर्यादित नाही. समाजातून या घातक प्रवृत्तीचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ नियमानुसार नष्ट करणे तितकेच महत्त्वाचे आहे,” आहे.
यावेळी त्यांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. राज्य सरकार युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध आणि कठोर अंमलबजावणी या तिन्ही स्तरांवर काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘नशा मुक्त भारत’ मोहीम सुरू केली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत व २०३० पर्यंत विकसित गोवा करतानाच नशा मुक्त भारत व नशा मुक्त गोवा करण्याचे ध्येय आहे. बाहेरून येणारे गोव्यात अमली पदार्थ आणत आहेत त्यांच्यावर एएनसी विभाग कारवाई करून जप्त करीत आहे. गोमंतकीयांना अमली पदार्थांपासून रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत.
‘नशा मुक्त भारत’ उपक्रमाखाली समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्त्वाखाली गोव्यात मोहीम राबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, नागरिकांनीही या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.