डिचोलीपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शिरगाव गाव वसले आहे. गावाच्या दक्षिणेला पैरा हे छोटे गाव आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री लईराई देवीचे भव्य मंदिर, देवीची जत्रा, तसेच अग्निदिव्य हे शिरगावचे वैशिष्ट्य आहे.

शिरगावात श्री लईराई देवीशी संलग्न १४ देवतांचे वास्तव्य आहे. या देवतांची नावे - श्री महामाया देवी, श्री सातेरी देवी, श्री देव रवळनाथ, श्री पूर्वाचारी, श्री ग्रामपुरुष, श्री लखमेवंश, श्री आयरेवंश, श्री क्षेत्रपाल, श्री ब्रह्म-ब्राह्मण, श्री होमखंडेश्वर, श्री लिंग महादेव, श्री आपेवंश, श्री देव कुळकार आणि श्री म्हारींगण. उत्सवाच्या वेळी प्रत्येक देवतेचा यथायोग्य मान-सन्मान केला जातो.
श्री लईराई देवीचे शिरगावात आगमन
श्री लईराई देवीचे आगमन शिरगावात नेमके केव्हा झाले, याची ठोस माहिती नाही. अनादी काळापासून शिरगावात देवीचे वास्तव्य आहे. फार वर्षांपूर्वी श्री लईराई देवी आपल्या सहा बहिणी व भाऊ यांच्यासह घाटमाथ्यावरून गोव्यात आली. ही भावंडे चोर्ला, मोर्ले, गिरोडे, म्हावळींगे, मुळगाव, डिचोली असा प्रवास करत मयेतील वोडणो येेथे पोहोचली. येथेच सर्वांनी आपण कोणत्या प्रदेशात जाणार ते ठरविले. त्यानुसार ही अवतारी भावंडे पवित्र ठिकाणी स्थानापन्न झाली. श्री महामाया देवी मुळगाव येथे, श्री केळबाई देवी मये गावात, श्री लईराई देवी शिरगाव येथे, श्री मोरजाई देवी पेडणे तालुक्यातील मोरजी येथे, श्री मिराई देवी म्हापसा येथे, श्री आदादिपा/आजादिपा देवी एका बेटावर, श्री शितलादेवी म्हणे पाताळात गुप्त झाली, भाऊ खेतोबा मयेतील वायंगणे गावात स्थायिक झाला. देवीच्या जत्रेच्या दिवशी देवीचे बंधू खेतोबा व भगिनींकडून मोगऱ्या कळ्यांची, फुलांची भेट येते.
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पैरा गावातून सत्पुरुष श्री कलंबादेवीचा कळस तरंगासह श्री लईराई देवीच्या मंदिरात येतो. या ठिकाणी कळसाची विधिवत पूजा केली जाते. पैराहून आलेल्या मानकऱ्यांचा मानसन्मान केला जातो. सत्पुरुष कलंबादेवीचा कळस परत पैरा गावात जाताना शिरगावच्या चौघुल्यांना ठरावीक ठिकाणी कौल दिला जातो.
लईराई देवीचे आदिस्थान-मुड्डी
अस्नोडे बसस्थानक आणि शिरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले देवीचे सध्याचे मंदिर यांच्या मधोमध मुड्डी या ठिकाणी देवी स्वयंभू, म्हणजेच वारुळाच्या रूपाने वास्तव्य करून आहे. ग्रामस्थांनी देवीला गावात येण्याची विनंती केली. देवीने ग्रामस्थांना कोंबडी-वराह पालन न करणे, दारूची खरेदी-विक्री न करणे तसेच प्राणिवध न करणे आदी अटी घातल्या. ग्रामस्थांनी सर्व अटी मान्य केल्या. तेव्हापासून गावातील मंदिरात देवी ‘कलश’रूपात विराजमान आहे. दरवर्षी जत्रेच्या दिवशी देवी मुड्डी या आदिस्थानावर विश्रांतीसाठी जाते. जत्रेचा कार्यक्रम तेथूनच सुरू होतो.
नावलौकीक मिळालेली जत्रा
शिरगावची जत्रा वैशाख शुद्ध पंचमीला होते. चैत्र शुद्ध पंचमीला मुळगावची, तर चैत्र शुद्ध अष्टमीला मयेची जत्रा होते. मुळगाव, शिरगाव व मयेतील जत्रा एकमेकांवर अवलंबून असतात. मुळगावच्या जत्रेच्या दिवशी शिरगावच्या होमखंडासाठी पहिली मोळी (भरो) घातली जाते. एका कथेनुसार असे सांगतात की, श्री लईराईची भावंडे मये गावातील वोडण्यार येथे पोहोचल्यानंतर त्यांनी खेतोबाला अग्नी आणण्यासाठी पाठविले. खेतोबा मुलांचा खेळ पाहण्यात रंगून गेला. भावाला उशीर झाला म्हणून श्री लईराई खेतोबाच्या शोधात गेली. खेळ पाहण्यात दंग झालेल्या भावाला पाहून श्री लईराई आणि खेतोबा यांच्यात शाब्दिक वाद झाले. खेतोबाने लईराईविषयी इतर बहिणींकडे तक्रार केली. इतर बहिणी लईराईवर रागावल्या. आपल्यावर आलेला आळ चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी देवी लईराईने भावंडांसमोर प्रतिज्ञा केली की, आपण ५०० भक्तांना घेऊन अग्निप्रवेश करू. त्यावेळेपासून शिरगावची जत्रा सुरू झाली. नंतर श्री केळबाई देवीनेही प्रतिज्ञा केली की, आपणही ७०० भक्तजनांसह अग्नी डोक्यावर घेऊन नाचू. मयेच्या माल्याची जत्रामध्ये देवी डोक्यावर अग्नी धारण करते, तर शिरगावच्या जत्रेत देवी अग्नीतून जाते.
शिरगावची जत्रा
सुरुवातीला जत्रा दीड दिवस असायची. नंतर तीन दिवसांची झाली आणि आता ही जत्रा पाच दिवस साजरी केली जाते. जत्रेला म्हापसा येथील मीराई सायबिणीकडून तेल व फुले भेट म्हणून येतात. मीराई सायबिणीच्या फेस्ताला शिरगावच्या देवीकडून तेल भेट पाठविले जाते. श्री लईराईला जत्रेच्या दिवशी व कौलांच्या वेळी पिटकुळणी व कुड्याच्या फुलांचा घोस देवीला अर्पण करतात. जत्रेच्या दिवशी सायबिणीच्या मंदिरात एक, दुसऱ्या दिवशी सातेरीच्या मंदिरात एक व तिसऱ्या दिवशी कुळाच्या मंदिराकडे एक, असे तीन दिवसांत तीन घोस कळसाला अर्पण करण्यासाठी द्यावे लागतात. देवीची ओटी भरताना मोगरीचे कळे असलेली आटी (फाती) अथवा आबोल्यांचे झेले यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. दरवर्षी जत्रेच्या दिवशी सकाळी कलशातील पवित्र तीर्थ प्राशन करण्याचे भाग्य भाविकांना प्राप्त होते.
देवीचे धोंड
देवीविषयी मनात अपार श्रद्धा, भक्ती आणि आदर असलेली कुणीही व्यक्ती देवीचे धोंड बनू शकते. नवस फेडण्यासाठीही धोंड होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रिया, लहान मुलांनाही धोंड होता येते. गुढीपाडवा झाल्यानंतर धोंडांना मांसाहार वर्ज्य असतो. नव्या धोंडांनी जत्रेचा दिवस धरून सहा दिवस आधी उपवास धरावा लागतो. स्नान करून ओल्या अंगाने अन्न, पाणी ग्रहण करावे लागते. कांदा-लसूण यांचा धोंडांच्या जेवणात समावेश असत नाही. जेवण सात्त्विक असते. शिरगावात आल्यानंतर धोंडांना तळीवर स्नान करावे लागते. मुड्डीवरील मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. तेथे देवीचा कौल घेतल्यानंतर त्यांना होमखंडातून जावे लागते.
श्री होमखंडेश्वर
होमखंड हे जत्रेतील प्रमुख आकर्षण व मुख्य विधी आहे. होमखंड अडचणीशिवाय पूर्ण करून घेण्याची जबाबदारी श्री होमखंडेश्वराची असते. होमखंडाशेजारील वडाचे झाड हे त्याचे स्थान आहे. होमखंडातून प्रवेश करणाऱ्या धोंडांचे रक्षण करण्याची जबाबदारी श्री होमखंडेश्वराची असते.
जत्रेच्या दिवशी होणारे विधी
जत्रेच्या दिवशी पहाटे मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या पवित्र मंगल कलशाची (कळस) पूजा-अर्चा केली जाते. कळसातील तीर्थ (न्हेवाण) काढून प्रत्येक घरात दिले जाते. मंदिरात देवीची पूजा-अर्चा केली जाते. दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास मुळगावची कवळास वाजत गाजत मंदिरात येते. भेटीच्या वेळी पहिले वाजोवणे होते. थोड्या वेळाने मये-वायंगणी गावातील कवळास भेटीचा विधी होतो. यावेळी दुसरे वाजोवणे होते. शिरगावातील ग्रामस्थ चौघुल्यांना सूचना देण्यासाठी तिसरे वाजोवणे होते. यानंतर चौघुले मंदिरात येतात. विधी झाल्यानंतर देवीची उत्सवमूर्ती पाळणी या सेवेकऱ्याच्या डोक्यावर दिली जाते. ही उत्सवमूर्ती मंदिरात आणल्यानंतर शृंगारली, सजविली जाते. सजविलेली उत्सवमूर्ती म्हणजेच ‘चिरा’ चौघुले चिरा धारण करणाऱ्या मोडाच्या डोक्यावर ठेवतात. ही चिरा मुड्डीवरील मंदिरात जाण्यासाठी निघते. आदिस्थानावर देवीची पूजा होते. नंतर ही चिरा पुन्हा मंदिरात येण्यासाठी निघते. वाटेतील मंदिरांसमोर भोवर मारून देवतांना भेट दिली जाते. मंदिरात पोहोचल्यानंतर काही विधी केले जातात.
रात्री श्री सातेरी देवीच्या मंदिरात आबा भोजनाचा विधी होतो. सातेरी देवीच्या चरणी सांगणे केले जाते. लईराई मंदिरात थळवाटणीचा विधी होतो. ‘पावशे’मार्फत होत असलेल्या थळवाटणीच्या अंतर्गत शिरगाव, मुळगाव, मये, वायंगिणे येथील ‘देवळी’ना त्याचप्रमाणे पाळणी व न्हावी (म्हालो) यांना तेल वाटप केले जाते. यानंतर ‘आरत’चा विधी होतो. यात कळसाचा मोड आणि त्याच्या मागोमाग भावीण आपापली आरत हातात घेऊन मंदिराबाहेरील खांबाकडे येतात. खांबावरील दिवे मोड प्रज्वलित करतो व घाट वाजवित मोड, तसेच भावीण पुन्हा खांबाकडून मंदिरात जातात.
आरती झाल्यानंतर मंदिरात ‘हळदोणी’चा विधी होतो. यात भावीण एका पाण्याने भरलेल्या कळशीत हळद घालते. हे हळदमिश्रित पाणी मोड व चौघुल्यांच्या पायावर घालते. चौघुले गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी चौघुल्यांसाठी सांगणे केले जाते. जत्रा आनंदात होण्यासाठी देवीला साकडे घातले जाते. यानंतर चौघुले गर्भकुडीत जातात. पिटकुळणी व कुड्याच्या फुलांचा घोस वापरून कळस सजविला जातो. कळस डोक्यावर घेणाऱ्या मोडालाही शृंगारले जाते. फुलांनी सजविलेला कळस व देवीचे दागिने धारण केलेला मोड यांना घेऊन सर्वजण मंदिरात येतात. काही विधी झाल्यानंतर चौघुले, सेवेकरी आणि देवीच्या नामघोषांनी बेधुंद होऊन नाचणाऱ्या धोणांसमवेत देवी स्वतःभोवती फेरा घालून वाजत गाजत होमखंडाच्या दिशेने निघते.
सांकवाकडच्या देवचाराला कौल दिल्यानंतर देवी होमखंडाकडे येते. होमखंडाजवळून जाताना चालता चालताच देवी एक छोटीशी चंद्रज्योत होमखंडात टाकून पुढे जाते. क्षणातच होमखंड पेटू लागते. तेथून देवी तळीवर जाते. तेथे स्नान करते. तेथे ‘मोडा’साठी आसनाची व्यवस्था असते. तळीवर काही विधी केले जातात. तेथून विश्रांतीसाठी देवी ‘मुड्डी’ या आदिस्थानावर जाते.
पहाटे मुड्डी येथे प्रत्येक धोंडाला देवीचा कौल दिला जातो. कुड्याच्या किंवा पिटकुळणीच्या फुलांच्या रूपाने प्राप्त झालेला कौल तोंडात घातल्यानंतर धोंडांमध्ये वेगळीच ऊर्जा संचारते. भक्तिभावाने धोंड नामघोष करत आनंदाने होमखंडातून जातात. देवीवरील श्रद्धेमुळे होमखंडातून जाण्याचा विधी होतो. धोंडांचा होमखंडातून जाण्याचा सोहळा पहाटेपर्यंत चालू असतो. धोंडांचा होमखंडातून जाण्याचा सोहळा धर्मशिळा येथे विश्रांती घेत देवी कौतुकाने पाहत असते. सर्व धोंड होमखंडातून गेल्याची खात्री झाल्यानंतर प्रथम चौघुले होमखंडातून जातात. नंतर पेरणी देवीच्या अग्निप्रवेशापूर्वी एक काव्य म्हणतो. काव्य म्हटल्यानंतर हजारो भाविक आणि धोंडांच्या साक्षीने आदिशक्ती श्री लईराई देवी होमखंडातून जाते. सोहळा झाल्यानंतर देवी ‘चव्हाठा’ येथे विश्रांतीसाठी थांबते. देवी होमखंडातून गेल्यावर होमखंडातून कोणीही जायचे नसते. कारण अग्नीची प्रखरता भयानक वाढलेली असते.
चार दिवस चालणारा कौलोत्सव
चव्हाठा येथील विधीनंतर कौल सुरू होतो. चव्हाठ्यावरून देवी श्री सातेरी देवीच्या मंदिरात येते. मंदिरात कळस ठेवल्यानंतर फुलांचा घोस बांघला जातो. काही धार्मिक विधी होतात. मानसवाडा येथून कौलांना प्रारंभ होतो. गावातील प्रत्येक घराच्या दारात देवीचे आगमन होते. सायबीण कौल देण्यासाठी दारी आल्यानंतर चौघुले मोडाच्या डोक्यावरील कळस चौरंगावर ठेवतात. घराचा मालक देवीची पूजा करून ओटी भरतो. पंचखाद्य व फळांचा नैवेद्य दाखवून भाविकांना प्रसाद वाटला जातो. देवीच्या आशीर्वादासाठी आतुरलेल्या भाविकांना सुख, शांती आणि मानसिक आनंद प्राप्त होतो. जत्रेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या कौलांना सुरुवात होते. हा सोहळा चार दिवस चालतो.
सायबीण मंदिरात जाण्याचा सोहळा
पाचव्या दिवशी वडाकडील घरांना कौल दिल्यानंतर देवी होमखंडाला कौल देते. देवळींना, मडवळांना कौल देत सीमेवरील देवतांना कौल देत भाविकांच्या साथीने देवी मंदिरात येते. पाचव्या दिवशी रात्री मंदिरात भव्य सोहळा होतो. ढोल ताशांच्या गजरात देवीचा नामघोष करत भक्तगण नाचतो. सायबीण मंदिरात जाण्याचा सोहळा झाल्यानंतर जत्रेची सांगता होते.
- राजेश रमाकांत वजरीकर