श्री संग्राम गणेश मंदिर, गणेशपुरी, म्हापसा

सन १९८३ साली म्हापशाच्या टेकडीवरील पठारी भागात पहिला गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. मूर्तीच्या विसर्जनावेळी छोटेखानी गणेशमंदिर बांधण्याचा निर्णय झाला. गणेशभक्तांच्या प्रयत्नांमुळे गणेशपुरीत भव्य-दिव्य मंदिर उभे राहिले.

Story: देवभूमी गोवा |
26th February, 07:15 pm
श्री संग्राम गणेश मंदिर, गणेशपुरी, म्हापसा

चौदा विद्या अाणि चौसष्ठ कलांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाची स्थापना गणेशपुरीत १९९३ मध्ये झाली. तुळशी-वृंदावन बांधकामापासून सुरुवात झाली. गणेशपुरीतील गणेशभक्त जीवन मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी उत्सव समितीची स्थापना करण्यात अाली. या समितीतर्फे सर्व धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. प्रथम मूर्ती पूजेचा मान अॅड. पुरुषोत्तम प्रभू यांना प्राप्त झाला.

१९८३ साली पहिला गणेशोत्सव साजरा

सन १९८३ साली म्हापशाच्या टेकडीवरील पठारी भागात उभ्या राहिलेल्या वसाहतीतील सुविद्य व जाणकार लोकांनी वसाहतीच्या एका टोकाला खुल्या जागेत मंडप घालून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले. पूर्वतयारीच्या बैठका डाॅ. चंद्रा नाईक यांच्या निवासस्थानी रोज होत होत्या. पहिला गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. २१ दिवसांच्या गणेशोत्सव मूर्तीच्या विसर्जनासाठी रहिवासी जमले, तेव्हा एक छोटेखानी गणेशमंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात अाला.

...आणि लहान मंदिर उभारून घुमटही चढविला

ज्या ठिकाणी सार्वजनिक श्री गणेशाची पूजा झाली होती, त्या ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतरही नियमित पूजा-अर्चा होत राहिली. त्या स्थानावर असलेला अासरा काढून टाकण्याचे अादेश गृहनिर्माण मंडळाने दिले होते; परंतु त्या अादेशाला न जुमानता कायमस्वरूपाचे सिमेंट काॅँक्रिटचे बांधकाम करण्यात अाले. पालिका मंडळाने सर्व साहित्य उचलून नेऊन मंदिराची संकल्पना उद् ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गणेशभक्त खवळून उठले व जोराने कामाला लागले. दुसरी मूर्ती अाणून अासनावर बसवली. नियमित पूजा-अर्चा सुरू झाली. गणपती मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे येऊ लागली. लहानसे दगडी मंदिर उभे करून त्यावर घुमटही चढविण्यात अाला.

गणेशभक्तांमुळे गणेशपुरीत उभे राहिले भव्य-दिव्य मंदिर

तद्नंतर जे महाभारत घडले ते सर्वश्रुत आहे. त्या संबंधीची माहिती गोव्यातील गणेश भक्तांनाच नव्हे तर जागतिक स्तरावर पसरली होती. म्हणतात ना ‘आले देवाजींच्या मनात, तिथे कोणाचे चालेना’. गणेशपुरीत वास्तव्य करण्यासाठी उच्च न्यायालयातही श्री गणेशामूर्तीला जाणे भाग पडले होते. श्री गणपती हे सर्वांचे लाडके दैवत. त्याची स्थापना त्याच जागेत व्हावी यासाठी गोव्यातील सामाजिक, धार्मिक व राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले. पेडणे ते काणकोणपर्यंत चळवळ सुरू झाली. आज गणेशपुरीत जे भव्य-दिव्य मंदिर दिसते, त्याचे श्रेय गोमंतकीय गणेशभक्तांना जाते. मंदिर परिसरांत एक सभागृह असावे म्हणून प्रयत्न झाले; परंतु त्यालाही काही लोकांनी हरकती घेतल्या. काही महिन्यांनंतर सर्व सुरळीत झाले. आता मंदिर परिसरात एक आधुनिक सभागृह आकार घेत आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम, ऑफीस व देवळाच्या अर्चकांची रहाण्याची सोय तिथे होणार आहे. या कामाला सुमारे ५.५० कोटी रुपये खर्च होणार आहे. देणग्यांचा ओघ चालू आहे.

वर्षभरात होतात १६ उत्सव

मागील ३२ वर्षे दररोज रात्री साडेआठ वाजता आरत्या होतात. विनायकी, संकष्टी व उत्सवावेळी, ॐकार, श्लोक, अथर्वशीर्ष यांचे पठण व सहस्रनामावली होते. सहस्रनामावलीत भाग घेण्यासाठी भक्तगण मुद्दाम हजेरी लावतात. मंदिरात वार्षिक जवळ-जवळ १६ उत्सव साजरे केले जातात. सर्वांत महत्त्वाचा म्हणजे २१ दिवस गणेशोत्सव. उत्सवात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम असतात. ऑर्केस्ट्रा किंवा चित्रपट गीतांचा कार्यक्रम कधीही सादर झालेला नाही, हे विशेष. २१ दिवसांचा गणेशोत्सव व गणेश वर्धापन दिनी महाप्रसादाची सोय असते. दरवर्षी चार ते पाच हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात.

दर तीन वर्षांनी कार्यकारी मंडळाची निवडणूक

प्रत्येक तीन वर्षांनंतर कार्यकारी मंडळाची निवडणूक होते. निवडणूक बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात होते. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे २०२५-२८ साठी उद्योजक दीपक गोवेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. इतर पदाधिकारीही बिनविरोध निवडून आले आहेत. नव्या समितीने सांस्कृतिक हॉलचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू केले आहे. अंदाजे पुढच्या वर्षी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम नव्या वास्तूत होणार आहेत. देवळाचे कंपाऊंड पूर्णत्वास आले आहे.

श्री गणेशाच्या कृपेने हरवलेल्या वस्तू सापडतात

देव-नवसाला पावतो, असे आपण मानतो; परंतु आमचा श्री गणेश हरवलेल्या वस्तूही सापडण्यासाठी मदत करतो, असा अनेकांचा अनुभव आहे. रोज मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येतात. मंगळवारी तर जत्रेचे स्वरूप असते. आज या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. मंदिरात साजरे होणारे कार्यक्रम नीटनेटके, सुनियोजित व समाजाभिमुख असतात. मंदिरामधील स्वच्छता प्रशंसनीय आहे. त्यांचे सर्व श्रेय देवस्थानचे पुजारी चेतन पुरोहित यांना आहे. पुजारी कसा असावा याचा आदर्शच त्यांनी घालून दिला आहे. संग्राम गणेश मंदिराला आता ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कल्पांतरापर्यंत राहील, अशी भाविकांची श्रद्धा आहे.            

- रवींद्र फोगेरी

हेही वाचा