उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली स्थगिती उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायालयाने उठवली

पणजी : मये येथील प्रसिद्ध श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानच्या वार्षिक कळसोत्सवाबाबत निर्माण झालेला पेच अखेर सुटला असून, उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायालयाने या उत्सवाला हिरवा कंदील दाखवला आहे. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी देवस्थानातील धार्मिक विधी आणि कळसोत्सव स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा न्यायालयाने या प्रशासकीय आदेशाला स्थगिती दिल्याने आता हा पारंपरिक उत्सव भक्तीभावाने साजरा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून संपूर्ण मये परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, महाजन गटांमधील अंतर्गत वाद आणि मानाच्या मागण्यांवरून हा उत्सव वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या वादातून गावात शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक पाऊल उचलले होते. उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दोन्ही गटांमध्ये सामंजस्य घडवून आणण्यासाठी अनेक बैठका घेतल्या, परंतु कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रशासनाने उत्सव स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे उत्सव पाहण्यासाठी जमलेल्या हजारो भाविकांमध्ये मोठी निराशा पसरली होती.
प्रशासनाच्या या आदेशाला देवस्थान समितीने न्यायालयात आव्हान दिले होते. प्रकरणाची गंभीरता आणि लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन, न्यायालयाने उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला स्थगिती दिली. न्यायालयाने केवळ उत्सवाला परवानगीच दिली नाही, तर हा सोहळा शांततेत पार पडण्यासाठी देवस्थान समितीला सहकार्य करण्याचे निर्देशही सरकारी यंत्रणेला दिले आहेत. न्यायालयाची ही स्थगिती पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असून, यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव निवळला आहे.
कळसोत्सव हा मयेतील संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. गेली दोन वर्षे सामंजस्याने हा उत्सव पार पडला होता, मात्र यंदा उद्भवलेल्या पेचप्रसंगावर न्यायालयाने तोडगा काढल्याने भाविकांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता न्यायालयीन परवानगी मिळाल्यानंतर देवस्थान समितीने उत्सवाच्या तयारीला पुन्हा जोमाने सुरुवात केली असून, पारंपरिक रितीरिवाजांनुसार हा सोहळा पार पडणार आहे.