नक्षलवादी प्रमुख ‘देवुजी’चे तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दहा कोटींचे होते बक्षीस : आता म्हणतोय, कायद्याच्या चौकटीत कार्य करणार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
just now
नक्षलवादी प्रमुख ‘देवुजी’चे तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण


आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी नेता ‘देवुजी’ (मध्यभागी). सोबत तेलंगणाचे डीजीपी बी. श्रीधर रेड्डी, स्पेशल इंटेलिजन्स ब्रांचच्या प्रमुख सुमती व इतर.

गडचिरोली : देशभरातील नक्षलवादी चळवळीची धुरा सांभाळणाऱ्या सीपीआय (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचा सरचिटणीस थीप्पिरी तिरुपती ऊर्फ ‘देवुजी’ (Tippiri Thirupati, alias Devuji) याने तेलंगणा पोलिसांसमोर काही सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण (surrender) केले. मूळचा करीमनगरचा रहिवासी असलेल्या देवुजीवर महाराष्ट्र, तेलंगणासह विविध राज्यांत एकूण दहा कोटींचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर त्याने सांगितले की​, यापुढे कायद्याच्या चौकटीत राहून मला लोकांसाठी काम करायचे आहे. राजकीय क्षेत्रातही कार्य करण्याची तयारी असल्याचे त्याने सांगितले.

अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच त्याची संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. मे २०२५ मध्ये सुरक्षा दलांनी तत्कालीन सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवराजू याला एका चकमकीत ठार केल्यानंतर देवुजीकडे संघटनेची सूत्रे आली होती. त्याच्यासोबत तेलंगणाच्या पेदापल्ली जिल्ह्यातील शस्त्रलापल्ली येथील रहिवासी असलेला केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम व अन्य सशस्त्र सदस्यांनी शरणागती पत्करली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावर्ती भागात करेगुट्टा टेकडी पारिसरात नक्षलविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

गनिमी काव्याने हल्ले करण्यात निष्णात असलेल्या आणि हिडमासारखे जहाल नेते तयार करणाऱ्या देवुजी याचे मूळ नाव थिप्पीरी तिरुपती असून नक्षल चळवळीत त्याला ‘संजीव’ किवा ‘पल्लव’ या टोपणनावांनीही ओळखले जाते. ६२ वर्षीय देवुजी हा मूळचा तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील कोरुतला येथील एका दलित कुटुंबातील आहे. १९८२ ते ९२ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीची पाळेमुळे रुजवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

अनेक हिंस्र कारवायांत सहभाग

१९९१ मध्ये महाराष्ट्रातील आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे अपहरण करण्यापासून ते २००८ मधील दंतेवाडा येथील ७६ जवानांच्या बलिदानाला कारणीभूत असलेल्या मोठ्या हल्ल्यांपर्यंत अनेक हिंसक कारवायांचे नियोजन त्यानेच केले होते. देवजीनंतर नक्षल चळवळीत आता केवळ मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती (७५), मिशीर बेसरा हे दोन नेते शिल्लक आहेत. त्यातील गणपती हा प्रकृती अस्वास्थामुळे अनेक दिवसांपासून भूमिगत आहे. 

हेही वाचा