तुरुंग उपअधीक्षक बोमू पावणे यांच्याकडून तक्रार

म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात सीमांचल परिदा या कैद्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी कैदी नारायण उर्फ बाबू भालेकर, सागर पाटील व मंथन च्यारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मारहाणीची घटना बुधवार, दि. २५ रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास कारागृहातील विभाग (सेल) ४ च्या आवारात घडली होती. याप्रकरणी तुरूंग उपअधीक्षक बोमू पावणे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
रात्रीच्या जेवणावेळी कैद्यांना त्यांच्या सेल (बॅरेक) मधून बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी सीमांचल परिदा याच्यासोबत कैदी नारायण भालेकर, सागर पाटील व मंथन यांनी वाद घातला. विभागाच्या बाहेर त्याला पकडून लाथाबुक्कीने जबर मारहाण केली होती. म्हापसा जिल्हा इस्पितळ नंतर गोमेकॉत जखमी सीमांचल याच्यावर उपचार करण्यात आले होते.
या प्रकरणी तुरूंग प्रशासनाने बुधवारीच कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली होती. परंतु ही तक्रार सविस्तर नसल्यामुळे पोलिसांनी तुरूंग प्रशासनाला घटनाक्रमानुसार व्यवस्थित तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी फिर्यादी कारागृह उपअधीक्षकांनी पोलिसांत सविस्तर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वरील कैद्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ११७(२) व ३(५) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू जाधव हे करीत आहेत.
कैदी, जेल वॉर्डन यांची अल्कोहोल चाचणी
संशयित कैदी नारायण उर्फ बाबू भालेकर, मंथन च्यारी व सागर पाटील हे या प्रकरणानंतर आरडाओरड करू लागल्याने ते दारूच्या नशेत असल्याच्या संशयितावरून त्यांची आल्कोहोल चाचणी करण्यात आली. शिवाय दारू प्राशन करून कारागृहात सेवा बजावणारे जेल वॉर्डन देविदास बंदे व दिलीप म्हाळशेकर यांचीही आल्कोहोल चाचणी करण्यात आली. कारागृह प्रशासनाने उत्तर गोवा जिल्हा इस्पितळामार्फत ही चाचणी केली. त्यामुळे कारागृहात कैदी तसेच तुरूंग कर्मचाऱ्यांना सहजरित्या दारूसारखे पदार्थ उपलब्ध होत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते.