एक कैदी जखमी, तुरुंग प्रशासनाकडून परस्परविरोधात तक्रार

म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये भाईगिरीच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत सीमांचल परिदा हा कैदी जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण प्रकरणी तुरूंग प्रशासनाने मंथन च्यारी, बाबू भालेकर व सागर पाटील या कैंद्यासह जखमी सीमांचल परिदा याच्याविरुद्ध परस्परविरोधी तक्रार नोंद केली आहे.
ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. रात्रीच्या जेवणावेळी कैद्यांना त्यांच्या सेल (बॅरेक) मधून बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी सीमांचल परिदा हा कैदी वरच्या सेलमध्ये गेला. तिथे मंथन च्यारी, बाबू भालेकर व सागर पाटील यांच्यासोबत त्याचा वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हातघाईवर आला.
दरम्यान, संबंधित तिघांनी इतर काही कैद्यांच्या मदतीने सीमांचल परिदा याला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जाते. त्याला जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली. हा प्रकार तुरुंग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी कैद्याची सुटका केली. नंतर जखमी सीमांचल याला उपचारार्थ म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. डोक्याला मार लागल्यामुळे त्याला पुढील उपचारार्थ गोमेकॉत पाठवण्यात आले.
या प्रकरणी तुरूंग प्रशासनाने कोलवाळ पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दिली आहे. परंतु ही तक्रार सविस्तर नसल्यामुळे पोलिसांनी तुरूंग प्रशासनाला सविस्तर घटनाक्रमानुसार तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे. कारागृह अधिकाऱ्यांकडून ही तक्रार आल्यावर पोलीस गुन्हा नोंद करणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
खून, खंडणी प्रकरणात गुन्हे दाखल
कैदी बाबू उर्फ रामकृष्ण भालेकर व मंथन च्यारी हे एकतानगर म्हापशातील अहमद देवडी खून प्रकरणातील संशयित आरोपी आहेत.
सागर पाटील हा टारझन पार्सेकर टोळीचा साथीदार असून त्याच्याविरुद्ध खंडणी, मारहाण व खुनी हल्ला असे गुन्हे नोंद आहेत.
सीमांचल परिदा हा बेतालभाटी सासष्टी येथे घडलेल्या डॉ. निरवण भरत यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे.