आसगाव अपघात प्रकरणी जीप चालकाला अटक, सुटका

डांबरीकरणामुळे लपलेला गतिरोधक ठरला अपघाताचे कारण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
1 hours ago
आसगाव अपघात प्रकरणी जीप चालकाला अटक, सुटका

म्हापसा : आसगाव येथे हॅप्पीबार जंक्शनवर रेन्ट अ कॅब थार जीप व आय २० कारमध्ये झालेल्या प्राणघातक अपघाताला कारणीभूत संशयित शौर्य अनूप गोयल (१९, दक्षिण दिल्ली) याला हणजूण पोलिसांनी अटक केली व नंतर त्याची वैयक्तिक जामिनावर सुटका केली. अपघातात भगत राम शर्मा (६५, रा. भोपाळ मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला होता. तर, गंभीर जखमी लीला भगत शर्मा (६०) यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

मंगळवार, २४ रोजी रात्री हणजूण पोलिसांनी वाहन चालक शौर्य गोयल याला अटक केली. नंतर १० हजारांच्या वैयक्तिक जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. तत्पूर्वी घटनेच्या दिवशी गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी संशयिताला नोटीस बजावली होती.

अपघातात कारमधील भगत राम शर्मा यांचा मृत्यू झाला होता. तर, त्यांची पत्नी लिला शर्मा व चार महिन्यांची नात जखमी झाली होती. तसेच या गाडीतील चालक तुषार पूनिहाल (रा. दिल्ली), त्यांची पत्नी व मेहुणा या तिघांनाही किरकोळ जखम झाली होती. शिवाय थार जीपमधील कार चालक शौर्य गोयल (१९, रा. दक्षिण दिल्ली) याच्यासह जीपमधील त्याच्या चार मैत्रिणी किरकोळ जखमी झाल्या होत्या. संशयित आरोपी हा आपल्या चार कॉलेजवयीन मैत्रीणींसमवेत गोव्यात पर्यटनासाठी आला असता हा अपघात घडला होता. संशयित व त्याच्या मैत्रिणी आसगावमधील एका व्हिलामध्ये उतरल्या होत्या.

हणजूण पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या १०६(१), २८१ व १२५ कलमान्वये निष्काळजीपणे वाहन हाकणे व सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साईश किनळेकर हे करत आहेत.

हा अपघात सोमवार, दि. २३ रोजी सायंकाळी ३.३० वा. सुमारास घडला होता. आसगाव हणजूण रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यामुळे घटनास्थळी असलेला गतिरोधक नजरेस पडत नव्हता. गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव जीए ०३ व्ही ५६९५ क्रमांकाची थार जीपने जीए ०८ एबी ६६८५ क्रमांकाच्या आय २० कारला जोरदार धडक दिली होती. 

हेही वाचा