१३ संशयित आरोपी, ३०६ साक्षीदार : आठ संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत

म्हापसा : बर्च बाय रोमिओ लेन क्लब अग्नितांडवप्रकरणी हणजूण पोलिसांनी १३ संशयित आरोपींविरूध्द ४,१५० पानी आरोपपत्र म्हापसा न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात ३०६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
संशयित आरोपींमध्ये सौरभ लुथरा, गौरव लुथरा, अजय गुप्ता या क्लबच्या बिईंग जीएस हॉस्पिलिटी गोवा हडफडे एलएलपी कंपनीच्या मालकांसह जागेचे मालक सुरींदर कुमार खोसला तसेच बर्चचे कॉपोरेट सरव्यवस्थापक राजीव निमाईचंद्र मोडक (नवी दिल्ली), सरव्यवस्थापक विवेक चंद्रभान सिंग (उत्तरप्रदेश), ऑपरेशन मॅनेजर बिजय कुमार उमेश नारायण सिंग (झारखंड), गेट मॅनेजर प्रियांशू कृष्णकुमार ठाकूर (नवी दिल्ली), बार मॅनेजर राजवीर रुद्रनाथ सिंघानिया (उत्तरप्रदेश), माजी सरपंच रेशन रेडकर (हडफडे), बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर (मयडे), तसेच के डान्स इव्हेन्ट प्रा. लि. कंपनीचे संचालक मयुर मृणांग कोलवाळकर (आल्तो पर्वरी) व के. इव्हेंट प्रा. लि. कंपनीचे सरव्यवस्थापक मोहम्मद अफिफ बतेरी (आल्तो पर्वरी) यांचा समावेश आहे.
संशयित आरोपी सुरींदर कुमार खोसला हा युके येथे असल्याने पोलिसांनी अजामीनपात्र अटक वॉरंट आणि प्रोक्लेमेशन नोटीस जारी केली आहे. तर संशयित मयूर कोलवाळकर व मोहम्मद अफिफ बतेरी यांना अद्याप अटक झालेली नाही. तर, राजवीर सिंघानिया व प्रियांशू ठाकूर वगळता इतर ८ संशयित आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, ही अग्नितांडव दुर्घटना ६ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. या दुर्घटनेत २५ निष्पाप लोकांचा बळी केला होता. तर, सहाजण जखमी झाले होते. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर यांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या १०५, १२५, १२५(अ), १२५(ब), २८७ व ३(५) कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
कोहली वगळून इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल
आग दुर्घटनेप्रकरणी हणजूण पोलिसांनी भरतसिंग कोहली (दिल्ली) याला अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे. सुरुवातीला कोहली हा बर्च बाय रोमिओ लेनचा गोवा प्रमुख असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अटक केल्यानंतर संशयित हा लुथरा बंधूंचा दिल्लीतील वाहन चालक असल्याचे उघडकीस आले. देशाबाहेर पळून जाताना सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांनी आपल्या क्लबच्या व्यवस्थापकांना भरतसिंग कोहली हा सर्वतोपरी मदत करेल, अशी हमी दिली होती. त्यामुळे कोहली हाच क्लबचा गोवा प्रमुख असावा असा पोलिसांना संशय होता. कोहली याचा याप्रकरणाशी काहीही संबंध नसल्याने पोलीस चौकशीत आढळून आल्याने त्याला वगळून पोलिसांनी इतरांविरुद्ध हे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
मोहम्मद बतेरीने केली आतिषबाजी
बर्च क्लबमध्ये संगीत कार्यक्रम सादरीकरणावेळी पायरो गन हे कृत्रिम फटाके फोडण्याची जबाबदारी हा इव्हेंट करणाऱ्या के. इव्हेंट प्रा. लिमिटेड कंपनीने आपला सरव्यवस्थापक मोहम्मद अफिफ बतेरी याच्यावर सोपवली होती. याच कृत्रिम फटाक्यांमुळे क्बबला आग लागून ही भीषण दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. घटनेच्या दिवशी या फटाक्यांची आतिषबाजी रिमोटच्या सहाय्याने संशयित सरव्यवस्थापक मोहम्मद अफिफ बतेरी याने केली होती.