डिचोलीतील खासगी विद्यालयात, कुजिरा बांबोळीतील धेम्पो कॉलेजमध्ये चोरी

डिचोली : येथील एका खासगी विद्यालयात तसेच कुजिरा बांबोळीतील धेम्पो कॉलेजमध्ये चोरीचा प्रकार घडला.
डिचोली येथील एका खासगी विद्यालयात बुधवारी मध्यरात्री चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरांनी विद्यालयाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व तेथील सर्व कपाटे उघडून कागदपत्रे आणि साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे आढळून आले.
चोरीसाठी वापरण्यात आलेली काही हत्यारे घटनास्थळीच टाकून चोर पसार झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पोलीस पथकाने विविध पद्धतीने तपास करत परिसरात शोधमोहीम राबवली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले; मात्र अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
यापूर्वीही या विद्यालयात चोरीची घटना घडल्याचे समजते. दरम्यान, या चोरीत नेमका किती ऐवज, रोकड अथवा इतर साहित्य लंपास झाले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
धेम्पो कॉलेजमध्ये चोरी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
म्हापसा : कुजिरा बांबोळी येथील श्रीनिवास सिनाई धेम्पो कॉलेज फोडून अज्ञातांनी सुमारे अडीच लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. लंपास झालेल्या मुद्देमालामध्ये ९९ हजार रोख रक्कम आणि तीन लॅपटॉपचा समावेश आहे.
चोरीची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी तक्रार दाखल केली आहे. चोरीच्या घटनेवेळी महाविद्यालयातील सुरक्षारक्षक गाढ झोपेत होता.
बांबोळी येथील दीनदयाळ इंटेग्रेटेड स्कूल कॉम्पलेक्स, कुजिरामधील धेम्पो कॉलेज इमारतीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चार चोरांनी आत शिरकाव केला. त्यानंतर प्राचार्य तसेच व्यवस्थापकांचे केबिन फोडले. केबिनमधील कपाटात ठेवलेली ९९ हजार रुपये रोख रक्कम तसेच तीन लॅपटॉप चोरून हे चोर पसार झाले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत अडीच लाख आहे.
कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार बुरखाधारी चोर बंदीस्त झाले आहेत. याप्रकरणी आगशी पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.