मुख्यमंत्री असेल तर मंत्र्यांना काहीच अधिकार नसतो!, फडणवीसांचे अनुभवाचे बोल

मंत्र‌िमंडळात अस्वस्थता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
मुख्यमंत्री असेल तर मंत्र्यांना काहीच अधिकार नसतो!, फडणवीसांचे अनुभवाचे बोल

मुंबई : मुख्यमंत्री (Chief Minister) असेल तर मंत्र्यांना काहीच अधिकार नसतो. तत्कालीन उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) एकनाथ शिंदेच्या अधिकारातच आपणही उपमुख्यमंत्री असताना काम करीत होतो. कोणी काय वक्तव्ये केली हे माहिती नाही, वक्तव्ये केली असल्यास त्या मंत्र्यांचे पुरावे द्या, त्याचा प्रस्ताव लगेच राज्यपालांकडे (Governor) पाठवतो, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर मंत्र्यांमध्ये (Minister)  अस्वस्थता पसरली तर सत्ताधारी सदस्यांनी जोरदार बाके वाजवत प्रतिसाद दिला.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी औरंगजेब, टिपू सुलतानच्या उदात्तीकरणावरून कॉंग्रेसला तर हिंदी सक्तीच्या विषयावरून ठाकरे बंधूंना खडे बोल सुनावले. सरकारमध्ये सर्वकाही आपणच आहोत याची जाणीव आपल्या मित्र पक्षांना करून दिली. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना ही सुरू करतानाच त्यात समावेश होणाऱ्यांचा कालावधी हा ११ महिन्यांसाठी असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

पण या तरुणांना सेवेत कायम करू, असे जाहीर आश्वासन सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने दिले होते; याकडे शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या मंत्र्यांनी या योजनेतील तरुणांना नोकरीत कायम करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे पुरावे द्या, त्या मंत्र्यांचा प्रस्ताव लगेच राज्यपालांकडे पाठवतो, असा टोला पुढे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

त्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावल्याची कुजबूज सभागृहात सुरू झाली. कारण भास्कर जाधव यांनी शिंदे यांनीच तसे आश्वासन दिल्याचे लक्षात आणून दिले होते.

हेही वाचा