प्राचार्यपदावर दावा करणाऱ्या शिक्षकाची याचिका फेटाळली

पणजी : उच्च माध्यमिक विद्यालयात ज्येष्ठ शिक्षक असला तरी, जर त्याच संस्थेच्या विद्यालयाचा मुख्याध्यापक पात्र असेल, तर तोच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी पात्र ठरतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. त्यामुळे प्राचार्यपदावर दावा करणाऱ्या संबंधित शिक्षकाची याचिका फेटाळण्यात आली.
हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुमन श्याम आणि अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने दिला.
विद्या भारती संस्था तीन शैक्षणिक संस्था चालवते. म्हापसा येथील गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गजानन मांद्रेकर निवृत्त झाल्यानंतर संदीप पाळणी यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीला उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा पै पाणंदीकर यांनी न्यायालयात आव्हान दिले. संदीप पाळणी हे गणेश उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक नव्हते, तर ते संस्थेच्या कामुर्ली येथील पिपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. त्यामुळे ते प्राचार्यपदासाठी पात्र नाहीत, असा दावा याचिकाकर्त्या शिक्षिकेने केला होता.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून संदीप पाळणी यांची नियुक्ती नियमांनुसार योग्य असल्याचे स्पष्ट केले.
याचिकाकर्त्या शिक्षिकेने असा युक्तिवाद केला होता की, प्राचार्य गजानन मांद्रेकर रजेवर असताना आपण ज्येष्ठ शिक्षक असल्याने प्राचार्यपदाचा कार्यभार सांभाळत होते.