पैशांसाठी तगादा लावत असल्याने साळगावात पतीने केला पत्नीचा खून

सुरीचे वार करून घेतला जीव : संशयित स्वत:हून पोलिसांना शरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
पैशांसाठी तगादा लावत असल्याने साळगावात पतीने केला पत्नीचा खून

म्हापसा : मुड्डोवाडो, साळगाव येथे एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मूळ गदक कर्नाटक येथील पती-पत्नीमधील कौटुंबिक कलहाचे रुपांतर हत्येत घडले. पत्नी रुक्मिणी विनोद राठोड (३६) हिचा गळ्यावर सुरीचा वार आणि गळा आवळून खून केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी पती विनोद भालचंद्र राठोड (४०) याला अटक केली.

खुनाची घटना शुक्रवार, दि. २७ रोजी दुपारी १.४५ वा. सुमारास उघडकीस आली. तर, घटना सकाळी ११.३० वा. सुमारास घडली होती. संशयित आपल्या १२ वर्षीय शाळकरी मुलासमवेत साळगाव पोलीस स्थानकात दाखल झाला, त्यानंतर या खुनाचा प्रकार उघडकीस आला.

पत्नी वारंवार पैशांची मागणी करत होती. त्यामुळे या प्रकारणातून संशयिताने रागाच्या भरात तिच्या गळ्यावर सुरीने वार केला. नंतर जखमी अवस्थेत तिचा गळा आवळून तिला ठार केले. त्यांच्या शेजारी दोन भाडेकरू राहतात. मात्र, त्यांना खुनाची कोणतीही चाहूल त्याने लागू दिली नाही. नंतर पत्नीला खोलीतच टाकून तो मुलांना शाळेत आणायला गेला. प्रथम त्याने आपल्या दोन्ही मुलींना मेहुणीच्या घरी नेऊन सोडले व नंतर तो लहान मुलाला शाळेतून घेऊन थेट पोलीस स्थानकावर पोहचला. पळून न जाता स्वत:हून पोलिसांना शरण आला.

साळगाव पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याच्या खोलीला बाहेरून कडी होती. पोलिसांनी दरवाजा उघडताच रुक्मिणी खोलीमध्ये निपचित पडलेली दिसून आली. संशयिताने पत्नीच्या मृतदेहावर चादर घातली होती. पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे व हरिश्चंद्र मडकईकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवला.

रुक्मिणीचा भाऊ विठ्ठल लमाणी यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली.

दरम्यान, रुक्मिणी राठोड ही तीन महिन्यांपूर्वीच मुड्डोवाडो साळगाव येथील घटनास्थळी भाडेकरू म्हणून राहायला आली होती. या एकमजली घराच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीमध्ये ती आपल्या दोन मुली व एका मुलासह राहत होती. ही मुले इयत्ता ६ वी, ८ वी व ९ वी मध्ये शिक्षण घेत आहेत.

पती- पत्नीमध्ये सतत भांडणे

विनोद राठोड हा सात- आठ महिन्यांपूर्वी गावी गेला होता व आठ दिवसांपूर्वी खोलीवर राहायला आला होता. त्यापासून पत्नी त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्यांच्यात भांडणे होत असल्याने घर मालकाने त्यांना खोली सोडण्यास सांगितले होते. येत्या १ तारखेपासून ते दुसरीकडे राहायला जाणार होते. परंतु त्यापूर्वीच संशयिताने तिचा खून केला.

सांगोल्डातील घर कर्जापोटी गहाण

रुक्मिणी हिचा भाऊ तसेच विवाहित दोन बहिणी गोव्यातच वास्तव्यास आहेत. पत्नीचा खून केल्यावर संशयिताने पर्रा येथे राहणाऱ्या मेहुणीच्या घरी दोन्ही मुलींना शाळेतून आणून सोडले होते. विनोद याचे सांगोल्डा येथे घर आहे. कर्जापोटी हे घर त्याने गहाण ठेवलेले आहे.