मनी लाँड्रिंगचे व्यवहार केल्याची थाप मारून ज्येष्ठ नागरिकाची ९०.८५ लाखांची फसवणूक

‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार : अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th February, 10:18 pm
मनी लाँड्रिंगचे व्यवहार केल्याची थाप मारून ज्येष्ठ नागरिकाची ९०.८५ लाखांची फसवणूक

पणजी : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तसेच जेट एअरवेजचे मालक नरेश गोएल यांच्याशी निगडित मनी लाँड्रिंगचे व्यवहार केल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तिसवाडी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची ९०.८५ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला.

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तिसवाडी तालुक्यातील एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आणि केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून ८५५२८४१६१५, ९९५७३५१८३२, ८४२१७९५८२५ आणि ७५२७९०१७६८ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कॉल केला. त्यांनी जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तक्रारदाराचा सहभाग असल्याचे सांगत, गोयलकडून कमिशन घेतल्याचा आरोप केला.

तक्रारदाराला २३ फेब्रुवारी पूर्वी ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे दबाव टाकण्यात आला. हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यांत ९० लाख ८५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

पोलिसांची नागरिकांना सतर्कतेची सूचना

डिजिटल अरेस्ट तसेच इतर सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून वेळोवेळी जनजागृती करून विविध सूचना देण्यात येत आहेत. अनेक प्रकरणांत गुन्हेगार नागरिकांना व्हिडिओ कॉल करून स्वतःला पोलीस, सीबीआय किंवा इतर तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवतात आणि संबंधित व्यक्तीला अटक झाल्याचे सांगून धमकावतात. अशा प्रकारचे संशयास्पद कॉल आल्यास नागरिकांनी तो कॉल तत्काळ बंद करावा. कोणत्याही परिस्थितीत संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला ओटीपी देऊ नये, मोबाईल स्क्रीनचा अ‍ॅक्सेस देऊ नये किंवा पैसे पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशा कॉलची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा १९३० अथवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर द्यावी.