लोकांवर कोणतीही गोष्ट मुद्दाम लादणार नाही : दामू नाईक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22 mins ago
लोकांवर कोणतीही गोष्ट मुद्दाम लादणार नाही : दामू नाईक

मडगाव: लोकांना जी गोष्ट नको असेल, ती भाजप कोणावरही मुद्दाम लादणार नाही; कारण राज्य सरकार जो विकास करत आहे, तो लोकांसाठीच आहे. जर जनतेलाच एखादा प्रकल्प मान्य नसेल, तर त्याच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले.

मडगाव येथील एका कार्यक्रमानिमित्त आले असता, राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाईक बोलत होते. ते म्हणाले की, विकासकामे ही लोकांसाठीच केली जातात, त्यामुळे ती त्यांना नको असल्यास सरकार आग्रही राहणार नाही. काहीवेळा एका बाजूला विकासाचा विचार असतो, तर दुसऱ्या बाजूला काही लोकांना त्याचा त्रास जाणवत असतो; अशा वेळी लोकांचा विरोध असेल तर ते प्रकल्प लादले जाऊ नयेत. मिराबाग येथील बंधाऱ्याच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना असून, त्यांना योग्य निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आपणही लक्ष देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भाजपचे लक्ष संघटनेवर

आरजी आणि आम आदमी पक्षाच्या संभाव्य युतीबाबत विचारले असता नाईक म्हणाले की, त्यांच्या पक्षातील राजकीय घडामोडींची माहिती त्यांनाच असेल. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांच्या हालचालींची चिंता न करता, पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी केवळ संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करत आहे.


हेही वाचा