ऑनलाईन फसवणुकीचा कहर; बनावट ‘आरटीओ इ चलन’ पाठवून एकाचे १.३७ लाख लाटले

पणजी पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
ऑनलाईन फसवणुकीचा कहर; बनावट ‘आरटीओ इ चलन’ पाठवून एकाचे १.३७ लाख लाटले

पणजी : गोव्यात (Goa) ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. फसवणूक करणारे नवेनवे प्रकार शोधून काढत आहेत. आणि या फसवणुकीच्या जाळ्यात सापडून अनेकजण आपले कष्टाने कमावलेली रक्कम घालवून बसत आहेत. अशाच प्रकारे बनावट ‘आरटी  इ चलन’ची फाईल पाठवून एकाचे १.३७ लाख रुपये लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पणजी पोलिसांनी (Panjim Police) अज्ञाता‌विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

 करंझाळे (Caranzalem) येथील एकाने याप्रकरणी पणजी पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, अज्ञाताने त्यांना बनावट ‘आरटी इ चलन’ची एपीके फाईल पाठवली. त्यानंतर त्याला ती फाईल डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले व सविस्तर माहिती मागितली.

त्यानंतर  बॅंक खात्याचे व वाहनासंबंधी तपशील भरून पाठवल्यानंतर बॅंक खात्यातून १ लाख ३७ हजार ८३३ रुपये काढण्यात आले. याप्रकरणी पणजी पोलिसांनी भारतीय न्याय संस्था २०२३ च्या कलम ३१९ (२), ३१८ (४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पणजी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महेश नाईक वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.