'३९-ए' विरोधातील लढा अधिक तीव्र करणार; वीरेश बोरकर यांचा निर्धार

रुग्णालयातून वीरेश आणि तुषार यांना डिस्चार्ज

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
'३९-ए' विरोधातील लढा अधिक तीव्र करणार; वीरेश बोरकर यांचा निर्धार

पणजी: सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार वीरेश बोरकर यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहावे लागल्याने विरोधकांना आपण खचलो आहोत असे वाटले असेल, मात्र आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून '३९-ए' या वादग्रस्त कलमाविरोधातील लढा पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.

आमदार बोरकर पुढे म्हणाले की, "गोव्यातील जमिनींचे रक्षण करणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. टीसीपी कायद्यातील कलम ३९-ए चा वापर करून सरकार पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे आणि स्थानिकांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. या बेकायदेशीर जमीन रूपांतरामुळे गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. प्रकृती ठीक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते या लढ्यात शारीरिकरीत्या उपस्थित राहू शकले नव्हते, तरीही त्यांचे कार्यकर्ते आणि गोवेकर हा लढा नेटाने पुढे नेत होते. आता प्रकृती स्थिर असून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून अन्यायाचा जाब विचारणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

३९-ए विरोधातील लढा आता अधिक तीव्र होईल. लोक जागृत झाले आहेत, त्यामुळे इतर आमदारांनी याला पाठिंबा दिला नाही तर जनताच त्यांना जाब विचारेल. विधानसभेत हे कलम रद्द झाले नाही तरीही आमचा संघर्ष थांबणार नाही, असेही त्यांनी नमुद केले. यावेळी त्यांनी ३९-ए कलमाच्या नावाखाली चालणाऱ्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली. केवळ मातीसाठी आणि भावी पिढीच्या भविष्यासाठी हा संघर्ष सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा