ऋषी मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरमल भूमीत श्री रवळनाथ भूमिका पंचायतन व श्री देवी भूमिका देवस्थान अशी दोन मंदिरे आहेत. श्री देव रवळनाथ देवस्थान ठाकूर / नाईक (गावकर), नाईक यांच्याकडे श्री भूमिकादेवी देवस्थान आहे.

गावकर, मानकरी यांनी १९९४ साली नवीन मंदिर उभारण्याचे ठरवले. त्यासाठी समितीची निवड करण्यात आली. त्यात पाच मानकरी नाईक, ठाकूर, गावडे, मेथर, केपकर होते. शिवाय गावातील ५० ते ६० जणांचा समावेश होता. देवस्थानचे मुंबईस्थित मंगेश संझगिरी, वास्तुकार यांच्या सहकार्याने मंदिराचा प्लान, आराखडा निश्चित केला. देवस्थानचे महाजन केरकर कुटुंबियाची भेट घेऊन मंदिराच्या नवीन वास्तू उभारणीस मान्यता घेतली. जुन्या मंदिराचा ढाचा उतरविल्यानंतर नवीन बांधकाम अर्धवट राहणार नाही, असे हमीपत्र दिल्यानंतरच १९९५ साली मंदिर उभारणीच्या कामास प्रारंभ झाला.
१९९९ पासून प्रसाद, पावणी सुरू
१९९५ साली श्री रवळनाथ मंदिर व प्रांगणातील श्री महादेव लिंग मंदिराच्या कामास प्रारंभ झाला. मंदिर बांधकाम समितीच्या तीन पदाधिकाऱ्यांच्या संमतीने बँकेत खाते उघडले. मागील समितीने रोख २२ हजार रुपये सुपूर्द केले होते. स्थानिक भाविक, संस्था, क्लब, तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील भाविकांनी सढळ हस्ते मदत केली. देवाची पाषाणे पंढरपूर, कर्नाटकमधून सीमेपर्यंत आली. तेथून वाजतगाजत मंदिर प्रांगणात विधिवत स्थापनेपर्यंत ठेवली. माघ शुद्ध पंचमीला चार दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रारंभीचे एक वर्ष पूजा व अन्यविधी ठाकूर / नाईक, नाईक गावकरी करत होते. त्यानंतर मंदिराच्या पावित्र्यासाठी पुरोहित भटजींकडून नित्यपूजा सुरू केली. प्रसाद, पावणी सुरू केली ते साल १९९९ होते.
मंदिरात साजरे होणारे उत्सव
श्री रवळनाथ देवाचा वाढदिवस सोहळा माघ कृष्ण पंचमी या दिवशी साजरा करण्याची परंपरा २६ वर्षे चालू आहे. गुढीपाडवा, रामनवमी, वटपौर्णिमा, कवळास श्रावणी लघुरूद्र, नवे, घटस्थापना, दसरा देव नेसवले जाते. सेस भरले जाते व परंपरेने मडवळ कातरवेळ रक्तपात करतो. त्यानंतर ब्राह्मण, देवकारकडून धार्मिक विधी केले जातात. नंतर शिवलग्न होतात. त्यानंतर श्रीदेव भूमिका मंदिरात मानकरी ‘आडसर’ मान समर्पित करत असतो. त्यानंतर देवकार्याची ‘वर्सल’ असलेल्या देवकारकडून श्रीदेव वास्तव्यास जात असतो. प्रत्येक मानकऱ्याच्या निवासस्थानी ‘मडवळ’ भले भले करण्याची परंपरा अबाधित आहे. दसरा पावणेर केपकर, मेथर (हरमलकर) गावडे व महाजन या मानकऱ्यांच्या निवासस्थानानंतर गावात कौल प्रसादासाठी जात असतात. केरकर यांच्या पावणेरनंतर पोस्कोवाडा, खालचावाडा, बामणभाटीतून काैलप्रसाद देत तरंगांचे आगमन श्री देव रवळनाथ मंदिरात होते. देवस्थानातर्फे बामणभाटीतील श्री गिरोबा मंदिराची जत्रा उत्सव केला जातो. श्री गिरोबाला दोन शतकी जुन्या वस्तू श्री रवळनाथाच्या चरणी आहेत. श्री गिरोबाच्या जत्रेवेळी देवकार व स्थानिक समितीच्या मार्फत विधी केले जातात.
विशेष म्हणजे होळी पोर्णिमा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. पाचव्या दिवशी हळदणी कार्यक्रम, नंतर श्री भूमिका मंदिरात तसेच पाचव्या दिवशी रात्री परंपरेनुसार रामजी, देऊळवाडा, ठाकूर/नाईक, कोरकणवाडा व नवव्या दिनी खालचावाडा वस्त यांची नाटके सादर केली जातात.
या प्रसिद्ध देवस्थानचा जागृतपणा भाविकांनी अनुभवला असल्याने दरवर्षी भाविकांची वाढ होत आहे. हे देवस्थान म्हणजे ‘गोवरेची आग’ म्हटले जाते. स्वार्थ, अहंकार व द्वेशभावना न ठेवता कार्य केल्यास इच्छित फळ मिळते. अशी धारणा आहे. गावातील भाविक, भक्तांची मनोकामना पूर्ण होत असून, दोन्ही देवस्थाने गावची एकता व बंधूभाव राखून भाविकांना सुख-समृद्धी प्राप्त होत असते.