श्री महालसा नारायणी पंचायतन, जुने म्हार्दोळ, वेर्णा

पोर्तुगीज राजवटीत हिंदूंच्या जबरदस्तीने धर्मांतर करण्याला ऊत आला होता. मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. १५४३ च्या आसपास वेर्णातील भाविकांनी श्री महालसा देवीच्या मूर्तीचे फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ येथे स्थलांतर केले.

Story: देवभूमी गोवा |
27th February, 05:21 pm
श्री महालसा नारायणी पंचायतन, जुने म्हार्दोळ, वेर्णा

प्राचीन काळी वेर्णा म्हणजेच वरुणापूर हे निसर्गरम्य, श्रीमंत असे स्थान होते. चंडासुर नावाच्या राक्षसापासून या वरुणापूरवासीयांची सुटका करण्यासाठी भगवान परशुरामांनी श्री देवी महालसेची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे देवी महालसेचे आदिस्थान असलेले हे गाव सर्वांनाच परिचित आहे.

नुपूर तळीचे महत्त्व

देवी महालसेने आपल्या भक्तांची तृषा शमवण्यासाठी या पठारावर आपल्या नुपूर असलेल्या पदस्पर्शाने एक रेघ ओढली आणि पाण्याचा झरा भक्तांसाठी तयार केला. हा झरा म्हणजेच नुपूर तळी. देवीचे दर्शन झाल्यावर या देवळानजीक असलेल्या तळीचे दर्शन जरूर घ्यावे, असा रिवाज आहे. महालसेचे, नुपूर तळीचे आणि देव मल्हाराचे दर्शन घेतल्याखेरीज ही परिक्रमा पूर्ण होत नाही.

गोवा मुक्तीनंतर मंदिराचा पुनरुद्धार

सर्वत्र नंदनवन असताना पोर्तुगीज मात्र आपल्या भूमीत हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत होते. हिंदूंची श्रद्धास्थाने हाणून पाडण्याचा त्यांनी सपाटाच लावला होता. पोर्तुगीजांनी श्री देवी महालसेच्या देवळाचा विध्वंस केला आणि भक्ती पायदळी तुडवली गेली. हा घाव जिव्हारी बसला होता. गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर मंदिर पुनरुद्धार समितीची स्थापना झाली. १९७५ साली दत्त जयंतीच्या मुहूर्तावर, शृंगेरी मठाचे जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला. त्यानंतर मूर्ती पुनर्स्थापनेची तयारी करण्यात आली. १ मे २००५, चैत्र कृष्ण अष्टमी हा दिवस मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी ठरवण्यात आला. मुख्य मूर्तीसमवेत पंचायतनदेखील आहे. हळूहळू मंदिर उभारणीचे काम पूर्ण झाले. मंदिर हे केवळ वास्तूरूपात उभारणे व्यवस्थापन समितीला मान्य नव्हते. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले. समाजाला बांधून ठेवायचे असेल आणि धर्माचे रक्षण करायचे असेल तर असे कार्यक्रम आयोजित करावे लागतील, हे समितीने ओळखले होते.

श्री महालसा नारायणी देवालयातील उत्सव नवरात्री

श्रावण सरतो न सरतो तोवर वर्षभर जरी कापडात बांधून ठेवलेला लाकडी मखर बाहेर येतो आणि नवरात्रीची चाहुल लागते. नऊ दिवस देवीची नऊ रूप मखरात बसवून, देवी महालसेला झुलवले जाते. उद्, धूप आणि झुलणारा मखर म्हणजे साक्षात् देवीचेच दर्शन. घटस्थापनेच्या दिवशी रुजवण घालून सुरू झालेला हा शक्तीचा सोहळा, शस्त्रपूजन, कुमारिका पूजन, खंडेनवमी होऊन समाप्त होतो.

कोजागिरी पौर्णिमा

शरद ऋतूची चाहुल लागते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालसा देवीची पालखी वाजत गाजत सकाळी मल्हार भेटीला निघते. मल्हार मंदिरात पोहोचल्यावर श्री मल्हार व महालसा देवीची संयुक्त आरती केली जाते. हा क्षण अन्य कुठल्याही मंदिरात अनुभवता येत नाही. नंतर महालसा देवी संध्याकाळी दिंडीच्या पथकासमवेत नुपूर तीर्थ येथे प्रयाण करते. नुपूर तीर्थावर महालसा देवीची आरती केली जाते. दसरोत्सवाचे सीमोल्लंघन व सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. यानंतर पालखी मारुती मंदिराकडे जाते. तिथे आरती होऊन नंतर पालखी महालसा मंदिराच्या दिशेने प्रयाण करते. देवीच्या प्रांगणात चंद्राचे दर्शन घेऊन कोजागिरी साजरी केली जाते.

नौकाविहार (सांगोड)

दीपोत्सव अर्थात दिव्यांचा सण हादेखील देवळाच्या प्रांगणात साजरा केला जातो. देवीला नौकेत बसवून सांगोड उत्सव साजरा केला जातो.

वार्षिक जत्रोत्सव

जत्रोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. २४ तास अखंड नामस्मरण चालू असते. विविध भजनी मंडळे आपली कला देवीच्या चरणी समर्पित करतात. देवालयाने चालवलेल्या शाळेचे विद्यार्थी जत्रोत्सवात आपली कला सादर करतात. विविध फुलांनी सजविलेली महालसा आई त्या दिवसात अाणखी प्रसन्न दिसते.

असे म्हणतात की ‘सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे’ हे मंगल बोल ऐकायचे असतील तर अशी असंख्य शक्तिस्थाने, भक्तिस्थाने निर्माण करावी लागतील, हे व्यवस्थापन समितीच्या लक्षात आले आणि त्यामुळेच मारुती मंदिराची, मल्हार मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना झाली. या देवळांतदेखील वनमहोत्सव, कोजागरी पौर्णिमा, सोने लुटणे, महाशिवरात्री, असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.      

हेही वाचा