श्री देवी भवानी रामपुरुष, ओशेल, शिवोली

चारशे वर्षापूर्वी तुळजापूरहून गोव्यात उदरनिर्वाहासाठी आलेल्या लोकांनी कुलदेवी भवानी, रामपुरुष व इतर देवतांच्या मूर्ती आगरवाडाच्या श्री सातेरी मंदिरात ठेवल्या होत्या. काही कारणास्तव हे लोक नंतर शिवोली येथे स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी भवानी मातेचे मंदिर बांधले.

Story: देवभूमी गोवा |
27th February, 05:29 pm
श्री देवी भवानी रामपुरुष, ओशेल, शिवोली

आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी तुळजापूरहून गोव्यात उदरनिर्वाहासाठी आले होते. त्यांनी आपली कुलदेवी भवानी, रामपुरुष व इतर देवतांच्या मूर्तीही सोबत आणल्या होत्या. फिरत फिरत ते पेडणे तालुक्यातील आगरवाडा येथील श्री सातेरी देवीच्या मंदिरात पोहोचले. त्यांना श्री सातेरी देवीने आश्रयासाठी स्थान दिले. त्याच ठिकाणी त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या मूर्तीची ध्वजासह स्थापना केली. परंपरेनुसार देवी सातेरीने आमच्या पूर्वजांना पाचव्या मानासह स्थान दिले आहे. त्यामुळे आगरवाडा येथील स्थित असलेली श्री सातेरी देवीच्या मूर्तीची पुन:स्थापना करताना सदर देवस्थानला आमंत्रण दिले होते.

काही कारणावरून स्थानिक लोकांसोबत पूर्वजांचा वाद झाला होता. त्यामुळे ते आपले आगरवाड्याचे स्थान सोडून बार्देश तालुक्यातील शिवोली ओशेल येथील चौकी वाड्यासह गोव्यातील इतर भागात राहू लागले व तेथेच आपल्या कुटुंबाचा पसार केला. त्या काळी पेडणे तालुका इंग्रजांच्या राजवटीत, तर बार्देश तालुका पोर्तुगीजांच्या राजवटीत होता. पोर्तुगीज अधिकारी हिंदू देवतांची विटंबना, मूर्तीची मोडतोड करत होते. त्यामुळे पेडणे आगरवाडा येथील छोट्याशा मंदिरात देवतांच्या मूर्ती सोडून पूर्वज ओशेल शिवोली येथे राहू लागले. नंतर त्यांनी ओशेल चौकी येथे नूतन भवानी देवी मातेचे मंदिर बांधले. परंपरेनुसार आजही या मंदिरात देवीचे उत्सव साजरे केले जातात. विशेष म्हणजे आजही पेडणे आगरवाडा येथील पूर्वीच्या मंदिरातील मूर्तीना कौलप्रसाद घेऊनच ओशेल येथील उत्सव सुरू केला जातो. देवीच्या कृपाशीर्वादामुळे आगरवाडा आणि ओशेल शिवोली येथे मोठी मंदिरे बांधून मूर्तीची पुन:स्थापना करण्यात आली आहे. जागृत देवस्थान म्हणून गावोगावी या मंदिराची कीर्ती पसरली आहे. नेहमी नवस फेडण्यासाठी लोकांची देवळात गर्दी असते. ’नवसाला पावणारी देवी भवानी' म्हणून प्रख्यात आहे.

चौकी म्हणजे चौकाचे घर

या घराचे मालक कै. रावजी आगरवाडेकर यांच्यावर ब्राह्मणाचा अवसार येत असे. त्यांच्याच घरात देवीची जुनी मूर्ती होती. वडिलांचा अवसर कै. राघोबा आगरवाडेकर यांच्यावर येत होता. भवानीचा अवसर कै. रवळू शंकर आगरवाडेकर यांच्यावर येत असे. कलाटीवंस यांचा अवसर कै. बाबू नारायण आगरवाडेकर यांच्यावर येत असे. रामपुरुष अवसर कै. मसो आगरवाडेकर व नंतर कै. भास्कर नारायण आगरवाडेकर यांच्यावर येत असे. बादेश्वरांचा कै. साजरो सदाशिव आगरवाडेकर यांच्यावर येत असे. या वडीलधारी लोकांनी चौकीतील परंपरा जपून ठेवल्या आहेत. श्री भवानी देवीची मूर्ती लाकडापासून बनवली आहे. मूर्ती बनवणारे कलाकार आमचे गावचे सुपुत्र मधलेभाट - शिवोली येथील कै. पांडुरंग आगरवाडेकर यांचे पुत्र पुरुषोत्तम, केशव, राजाराम या बंधूंनी बनवली आहे.

देवीची वारस : चौकी, ईसापूर, घुबलावाडा, मधलेभाट - शिवोली, राय, गुडे, कायसूव, हणजुण, कळंगुट, नेरुल, पणजी, जोशी - खैराट, खोर्जुवे, जुवे, नादोडा, मये- डिचोली, पार्से, केरी या गावांत दायजी वास्तव्य करतात.

देवस्थानात साजरे करण्यात येणारे उत्सव :

आश्विन महिना : नवरात्री उत्सव (चौकी गाव)

कार्तिक अमावास्या : सुवासिनींतर्फे दिवजोत्सव (चौकी गाव )

माघ महिना : श्री रामपुरुष देवस्थानचा वाढदिवस ( आगरवाडा गाव )

माघ महिना : नऊ दिवसीय 'भवानी उत्सव - यात भजन, गोंधळ, देवीची ओटी भरणे आणि भाविकांना कौल देण्यात येतो. (चौकी गाव ).  दर महिन्याच्या मंगळवारी भजन, आरती, नैवेद्य व तीर्थप्रसाद.

- नितीन आगरवाडेकर
अध्यक्ष,  श्री देवी भवानी रामपुरुष देवस्थान समिती, ओशेल, शिवोली 

हेही वाचा