इस्रायल आणि अमेरिकेच्या भीषण हल्ल्यात इराण उद्ध्वस्त

तेहरान: मध्यपूर्वेत युद्धाने भीषण रूप धारण केले असून, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. या हल्ल्यात खामेनी यांच्यासह इराणचे १० उच्चपदस्थ नेतेही ठार झाल्याचे वृत्त असून, यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे वेधले गेले आहे.

उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडला खामेनेई यांचा मृतदेह
'द जेरुसलेम पोस्ट' आणि 'रॉयटर्स'ने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी तेहरानवर झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांनंतर बचावकार्य सुरू असताना खामेनेई यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडला. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी टेलिव्हिजनवरून देशाला संबोधित करताना खामेनी यांच्या मृत्यूचे दाट संकेत दिले आहेत. खामेनी यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले असून, ते मारले गेल्याची दाट शक्यता आहे, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हा हल्ला अत्यंत शक्तिशाली असल्याचे सांगत इराणच्या नेतृत्वाचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. दरम्यान आज सकाळी इराणच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनेने याबाबत पुष्टी केली. ईराणमध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात ाला आहे.

इराणचे 'टॉप' नेतृत्व साफ
या हल्ल्यात केवळ खामेनेईच नव्हे, तर इराणची सत्ता सांभाळणारे अनेक महत्त्वाचे चेहरे ठार झाले आहेत. यामध्ये खामेनेई यांचे प्रतिनिधी अली लारीजानी, सुरक्षा सल्लागार अली शामखानी, आणि आयआरजीसीच्या 'कुड्स फोर्स'चे प्रमुख इस्माईल कानी यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इराणचे संरक्षण मंत्री आमिर नासिरजादेह आणि दोन बड्या अण्वस्त्र शास्त्रज्ञांचाही या हल्ल्यात अंत झाला आहे.

२०० हून अधिक मृत्यू आणि युद्धाचे कारण
इराणच्या सरकारी वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत २०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. अमेरिकेच्या मते, इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखण्यासाठी आणि त्यांच्याकडून निर्माण होणारा धोका संपवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेने इराणला अणू इंधनाबाबत सवलती देऊ केल्या होत्या, मात्र इराण आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमावर ठाम राहिल्याने हा टोकाचा निर्णय घेण्यात आला. खामेनी यांच्या निधनामुळे आता इराणमध्ये वारसदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रदेशात प्रदीर्घ युद्धाची ठिणगी पडली आहे.
