एअरस्पेस बंद; दाबोळी-मोपा विमानतळांवर गोंधळाची स्थिती. पर्यटन-रेमिटन्स अर्थव्यवस्थेला धोका संभवतो..

पणजी: इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे मध्यपूर्व आशियातील आकाशक्षेत्र (एअरस्पेस) बंद करण्यात आले आहेत. या युद्धाचा थेट आणि मोठा परिणाम आखाती देशांत कामानिमित्त गेलेल्या हजारो नोकरदारांच्या कुटुंबांवर झाला आहे. विमान उड्डाणे रद्द झाल्याने प्रवासाचे वेळापत्रक खोळंबले असून, आखाती देशांमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबद्दल गोव्यातील कुटुंबांमध्ये प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
विमानतळावर प्रवाशांची दैना आणि उड्डाणे रद्द
गोव्यातील दाबोळी आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. कतारमधील विमानतळ आणि आकाशक्षेत्र बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांना विमानाने उड्डाण करण्याच्या काही मिनिटे आधीच उतरवण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसने आपली गोवा-दुबई विमानसेवा शनिवारी रात्रीच रद्द केली. याशिवाय, रविवारी १ मार्च रोजी होणारी दुबई-गोवा आणि गोवा-बहारीन ही महत्त्वाची उड्डाणेही रद्द करण्यात आल्याचे दाबोळी विमानतळ प्रशासनाने जाहीर केले.
दरम्यान, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवाशांसाठी विशेष नियमावली जारी केली असून, मध्यपूर्वेतील राजकीय अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आखाती देशांतील गोमंतकीयांमध्ये दहशतीचे वातावरण
सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये गोव्यातील हजारो तरुण नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तिथे सुरू असलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे आणि धोक्याच्या सायरनमुळे गोमंतकीय समुदायामध्ये घबराट पसरली आहे. कुवेतमध्ये राहणाऱ्या अनेकांच्या मनातील १९९० च्या इराकी आक्रमणाच्या भयाण आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मूळ पणजी, गोवा आणि सध्या कामानिमित्त कुवेत येथे स्थायिक एक तरुणाने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाहा व्हिडिओ.
सायरनच्या आवाजामुळे नागरिक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी मॉल्समध्ये गर्दी करत आहेत. जे गोमंतकीय सध्या सुटीवर किंवा वैद्यकीय उपचारांसाठी गोव्यात आले आहेत, ते तिथे अडकून पडलेल्या आपल्या कुटुंबाच्या काळजीत आहेत. जर हे युद्ध लांबले, तर जीवितहानीसोबतच मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः अकुशल कामगारांच्या रोजगारावर मोठी टांगती तलवार निर्माण झाली आहे.
पर्यटन आणि ट्रॅव्हल क्षेत्राला मोठा फटका
गोव्याच्या पर्यटन व्यवसायावरही या युद्धाचे सावट दिसून येत आहे. आखाती देशांतून येणारी आणि जाणारी सर्व विमान वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. अनेक विदेशी पर्यटक कतार एअरवेजचा वापर करतात, मात्र सध्या ते तिथेच अडकून पडले आहेत. गोव्याचा पर्यटन हंगाम संपायला अजून २-३ महिने बाकी आहेत. यादरम्यान अनेक चार्टर विमाने गोव्यात येतील. या चार्टर विमानांना इंधन भरण्यासाठी अनेकदा आखाती देशांच्या विमानतळांचा वापर करावा लागतो, त्यामुळे भविष्यात चार्टर विमानसेवांनाही मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. युरोपला जाणाऱ्या विमान सेवांवर अद्याप मोठा परिणाम झालेला नसला, तरी विमान कंपन्या प्रवाशांना सावध राहण्याचे संदेश पाठवत आहेत.

गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम
गोव्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आखाती देशांतून येणाऱ्या परकीय चलनावर (रेमिटन्स) अवलंबून आहे. गोव्यातील प्रत्येक सातव्या घरातील किमान एक व्यक्ती आखाती देशांमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे हे युद्ध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नसून, ते गोव्याच्या सामाजिक आणि आर्थिक मुळांवर घाला घालणारे ठरत आहे. जर युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले, तर गोव्यातील अनेक कुटुंबांचे उत्पन्न थांबून मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. सध्या सर्व गोमंतकीय केवळ एकाच गोष्टीची प्रार्थना करत आहेत, ती म्हणजे मध्यपूर्वेतील हा तणाव लवकरात लवकर कमी व्हावा आणि त्यांचे नातेवाईक सुखरूप मायदेशी परतावेत.
![]()