साळ येथील गडे उत्सवानिमित्त भाविकांची जय्यत तयारी; ५ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

मद्यविक्रीवर कडक बंदी जाहीर! उत्सवाचे पावित्र्य राखणाचे सर्वांना आवाहन.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
59 mins ago
साळ येथील गडे उत्सवानिमित्त भाविकांची जय्यत तयारी; ५ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

डिचोली: डिचोली तालुक्यातील साळ येथील संपूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेला 'गडेोत्सव' मंगळवार, ३ मार्च ते गुरुवार, ५ मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाचे चोख व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी श्री भूमिका मंदिराच्या सभा मंडपात प्रशासकीय अधिकारी आणि देवस्थान समितीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.


GADE FESTIVAL – Sal,Goa.


मामलेदार शैलेंद्र देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई, वाहतूक पोलीस, पाणीपुरवठा, अग्निशमन दल, वीज खाते, आरोग्य विभाग आणि अबकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते. तसेच श्री महादेव भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघश्याम राऊत, सचिव चंद्रकांत परब, उपसरपंच देऊ राऊत, पंचायत सचिव मुकेश नाईक आणि गडे समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Goan Varta: साळ येथील गडे उत्सवाला आजपासून प्रारंभ


वाहतूक व्यवस्थेत बदल

उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. धुमासे मार्गे येणाऱ्या वाहनांना रात्री १०:३० पर्यंत प्रवेश खुला असेल, त्यानंतर मेणकुरे मैदानाजवळ हा रस्ता बंद केला जाईल. कासारपाल मार्गे येणाऱ्या वाहनांना रात्री ११:०० नंतर बंदी असेल; ही सर्व वाहने दोडामार्ग रस्त्यावरून वळवण्यात येतील. भाविकांसाठी कासारपाल आणि धुमासे मार्ग पहाटे ५:३० नंतर पुन्हा खुले केले जातील. आपत्कालीन सेवांसाठी दोडामार्ग रस्ता सदैव खुला असेल.

कडक निर्बंध आणि सूचना

मद्यविक्रीवर बंदी: उत्सवाच्या तिन्ही रात्री आणि दिवसा गावात मद्य वाहतूक व विक्रीवर पूर्णतः बंदी असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अबकारी खात्यामार्फत कडक कारवाई केली जाईल.

गोबी मंचुरियनवर बंदी: आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने यंदापासून उत्सवात 'गोबी मंचुरियन'च्या गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे.

रस्त्यावरील अतिक्रमणास मनाई: मधलावाडा ते श्री चव्हाटेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने थाटण्यास मनाई आहे. भाविकांना चालताना अडचण येऊ नये म्हणून दुकाने रस्त्याबाहेर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाई: उत्सवादरम्यान दंगा-मस्ती करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेकडून त्वरित कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

साळचा गडे उत्सव : श्रद्धा, परंपरा आणि विलोभनीय थरार!

गोव्यात निरनिराळ्या देवदेवतांचे उत्सव परंपरेने साजरे केले जातात, मात्र साळचा गडेत्सव हा खऱ्या अर्थाने उत्सवांचा शिरोमणी मानला जातो. या उत्सवासाठी महाराष्ट्र-दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल येथून ६० फूट लांब आंब्याच्या झाडाची होळी आणली जाते. साळचे गडे, महाजन आणि कुडासे-कुंब्रल येथील युवक २५ ते ३० किमी अंतरावरून ही होळी मिरवणुकीने श्री महादेव मंदिराच्या प्रांगणात आणतात. फुलांनी सुशोभित केलेली ही होळी मध्यरात्री भाविकांच्या मदतीने खड्ड्यात उभी केली जाते.


GADE FESTIVAL – Sal,Goa.


पांढरे शुभ्र पायघोळ धोतर आणि कमरेला जाडजूड चामड्याचा काळा पट्टा, असा गड्यांचा पारंपरिक पेहराव असतो. ढोल-ताशांच्या गजरात गड्यांना अवसार (अंगात येणे) आल्यानंतर ते होळीला पाच फेऱ्या मारतात आणि डोंगरापलीकडे श्री करयेश्वर क्षेत्राकडे 'करूल्या' (प्रेते) आणण्यासाठी धावतात. वाटेत देवचार मशालीच्या उजेडात त्यांचे स्वागत करतो, असे मानले जाते. अनवाणी पायाने, काट्याकुट्यातून धावूनही गड्यांच्या पायाला ओरखडाही लागत नाही, हे या उत्सवाचे मोठे वैशिष्ट्य आहे.


Beauty of Sal Village: Gade of Sal Village


हा थरार पहाटे ४:३० वाजेपर्यंत सुरू असतो. त्यानंतर बाबरेश्वर, घवनाळेश्वर, पाताळेश्वर आणि भूमिका मंदिरात गडे दर्शन देतात. सातव्या दिवशी घोडेमोडणी झाल्यानंतर चव्हाटेश्वर मंदिरात तीर्थ देऊन उत्सवाची सांगता होते. भाविक मोठ्या श्रद्धेने आपली गाऱ्हाणी घालतात आणि नवस फेडतात. शिस्त, श्रद्धा आणि परंपरा यांचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा