रावण सत्तरी येथे रणमाले महोत्सवाचे उद्घाटन : पथकांचे सादरीकरण

रणमाले महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात रणमाले सादर करताना एक पथक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : व्यसनाधीनता, अपघात, अत्याचार, हिंसाचार अशा वाईट गोष्टींपासून समाजाला दूर ठेवण्यासाठी रणमाले प्रभावी समाजप्रबोधनाचे माध्यम बनले आहे. रणमाले कार्यक्रमात अशा विषयांवर विचारमंथन होऊ शकते. रणमालेत पारंपरिकता असलीच पाहिजे, मात्र वास्तवाचे भान ठेवून समाजाला पोखरणाऱ्या विषयांवर चिंतन होणेही तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन पूर्णानंद च्यारी यांनी केले. रावण-सत्तरी येथे रणमाले महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
रावण येथे वाळपई ग्रामीण कला व संस्कृती संस्था, कला व संस्कृती खाते, गोवा कोकणी अकादमी व सातेरी केळबाई घाडवंस देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने पंधराव्या स्व. रामा धुरी स्मृती रणमाले महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठावर गोवा वन विकास महामंडळाच्या चेअरमन आमदार डॉ. देविया राणे, केरी जिल्हा पंचायत सभासद नीलेश परवार, केरीच्या सरपंच नंदिता गावस, आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष वसंत गावस, वाळपई ग्रामीण कला व संस्कृती संस्थेचे अध्यक्ष अंकुश धुरी, संस्थेचे पदाधिकारी रघुनाथ धुरी, प्रशांत नाईक यांच्यासह इतर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवात सत्तरीतील रणमाले पथकांचे सादरीकरण होणार आहे.
सरपंच नंदिता गावस, जिल्हा पंचायत सभासद नीलेश परवार यांनीही विचार मांडले. अंकुश धुरी यांनी प्रास्ताविक केले. रणमालेची कला पुनर्जीवित करण्यासाठी योगदान देणाऱ्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव प्रशांत नाईक यांनी आभार मानले. प्रारंभी श्री सातेरी केळबाय बारावंश रणमाले पथक, न्यू कॉलनी, मोर्ले यांनी रणमालेचे सादरीकरण केले.
रणमालेची परंपरा पुन्हा सुरू करा : आमदार देविया राणे
आमदार डॉ. देविया राणे म्हणाल्या की, सत्तरी तालुका लोकगीत आणि लोकपरंपरांनी समृद्ध आहे. बदलत्या जीवनशैलीतही परंपरा जिवंत राहणे गरजेचे आहे. तरुणांनी लोककला, लोकगीते आणि लोकवाद्यांशी नाळ कायम ठेवावी. भविष्यातही अशा उपक्रमांना आवश्यक सहकार्य राहील. रणमालेची परंपरा बंद पडलेल्या गावांतील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ती पुन्हा सुरू करावी.