हणखणे येथे दोन हॉटमिक्स ट्रकांची समोरासमोर धडक; एक ट्रक पलटी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
हणखणे येथे दोन हॉटमिक्स ट्रकांची समोरासमोर धडक; एक ट्रक पलटी

पेडणे : हॉटमिक्स डांबरीकरण साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि हॉटमिक्स खाली करून परत येत असलेल्या दुसऱ्या ट्रकमध्ये हणखणे येथील झारापकर रबर प्लांटेशनपासून काही अंतरावर समोरासमोर अपघात झाला. या भीषण धडकेत एक ट्रक पलटी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मोपा पोलीस ठाण्यात चौकशी केली असता या अपघाताची कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, इब्रामपूर येथील हॉटमिक्स डांबरीकरण प्रकल्पातून रात्रीच्या वेळी ट्रकद्वारे डांबराची वाहतूक केली जाते. शुक्रवारी रात्री हॉटमिक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला खाली करून परत येणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक बसली.

ही धडक इतकी जबरदस्त होती की, एका ट्रकने पुढे काही अंतर जाऊन पलटी घेतली. पलटी झालेल्या ट्रकचे दोन्ही टायर तसेच ट्रकच्या पट्ट्यांचा पाटा तुटून दूरवर फेकला गेला. दरम्यान, हणखणे येथून हॉटमिक्स घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकचेही मोठे नुकसान झाले.

अपघाताची बातमी परिसरात पसरताच सकाळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. संबंधित दोन्ही ट्रक इब्रामपूर येथील एकाच गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपापसांत समझोता करून दुपारी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त ट्रक घटनास्थळावरून हटविण्यात आले.

हा अपघात सरळ रस्त्यावर झाला असून नेमका कसा घडला याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते, रात्रीच्या वेळी चालकाला झोप लागल्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला असावा. तर काहींच्या म्हणण्यानुसार, हॉटमिक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकवर अतिरिक्त प्रखर दिवे लावण्यात आले होते. त्या प्रकाशामुळे समोरून येणाऱ्या चालकाचे डोळे दिपल्याने अपघात घडला असावा. मात्र, अपघाताची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात नसल्याने या सर्व चर्चा केवळ तर्कांवरच आधारित आहेत.

हेही वाचा