दुर्घटनेत वृद्ध घरमालकीण जखमी, दीड लाखाचे नुकसान

म्हापसा : पिळर्ण येथील यशवंत इमारतीमधील फ्लॅटला आग लागून दीड लाखाचे नुकसान झाले. आगीत तेजल तुळशीदास नाईक (७४) ही वयोवृद्ध घर मालकीण जखमी झाली असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. एअर कुलरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.
ही घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी उठून तेजल नाईक या स्वयंपाक खोलीमध्ये चहा बनवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे असलेल्या एअर कुलरचा शॉर्टसर्किटमुळे भडका उडाला व फ्लॅटला आग लागली.
या दुर्घटनेत तेजल नाईक जखमी झाल्या. शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणार्या तिच्या मुलाने घटनास्थळी धाव घेत तिला आगीतून बाहेर काढले व रूग्णवाहिकेच्या सहाय्याने गोमेकॉत दाखल केले. यावेळी घरात नाईक यांनी नात झोपली होती. स्फोट होताच तिने फ्लॅटबाहेर धाव घेतली, त्यामुळे तिला कोणतीही दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्नीशमन दलाचे अधिकारी दामोदर पेडणेकर, हवालदार रामा नाईक, प्रल्हाद कोटकर, निखील सावळ, श्रीकांत सावंत, मनोज महाले व राजकिरण पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणात आणली.
आगीमध्ये स्वयंपाक खोलीतील वस्तू तसेच घरातील टीव्ही व इतर साहित्य जळाल्यामुळे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. साळगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.