साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पाळे-शिरदोन ग्रामस्थांचे आंदोलन यशस्वी, कोलवाळ कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
48 mins ago
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : नगर नियोजन कायद्याच्या कलम ३९ (अ) विरोधात पाळे-शिरदोन ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन चांगलेच पेटले होते. सांत आंद्रे मतदारसंघातील सर्व तात्पुरते आणि अंतिम जमीन रूपांतरण प्रस्ताव तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आल्याने या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. सांकवाळ औद्योगिक वसाहतीत आग, कोलवाळ कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली. याशिवाय फसवणूक, अपघाताच्या घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

हरमल पंचायत क्षेत्रात स्पा, मसाज पार्लरना बंदीचा ठराव

हरमल पंचायत क्षेत्रातील मसाज व स्पा पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय होत असल्याने पर्यटन स्थळाचे नाव बदनाम होत आहे. गावात मसाज व स्पा पार्लरवर बंदी घालण्याचा ठराव हरमल ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला.

एएसआय सारिका नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात (डिटेन्शन सेंटर) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) सारिका नाईक (गिरी म्हापसा) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली.


बोरी येथे बस-स्कूटर अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

बोरी येथील पेट्रोल पंपजवळ प्रवासी बस आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात मनोज देसाई (३८, नवदुर्गा मंदिर जवळ- बोरी) याचा रविवारी सकाळी गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

सोमवार

आमदार बोरकरांचे उपोषण आझाद मैदानावर सुरूच

नगर नियोजनाशी संबंधित वादग्रस्त कलम ३९ (अ) विरोधात आणि आमदार वीरेश बोरकर यांना न्याय मिळावा या मागणीसाठी छेडण्यात आलेले महाआंदोलन सोमवारी उग्र झाले. पोलिसांचा बंदोबस्त भेदून शेकडो आंदोलकांनी नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावल येथील खासगी बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

भरधाव ‘थार’ची कारला धडक बसून आसगावात कारचालक ठार

आसगाव येथील हॅप्पीबार जंक्नशनवर भरधाव रेन्ट अ कॅब थार जीपने आयटेन कारला धडक दिल्याने झालेल्या अपघात भगत राम शर्मा (६५, रा. भोपाळ) यांचा मृत्यू झाला. तर मयताची पत्नी लीला शर्मा व चार महिन्यांची नात जखमी झाली आहे.

मंगळवार 


मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही वीरेश उपोषणावर ठाम

नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ अ रद्द होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आमदार वीरेश बोरकर यांनी जाहीर केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आझाद मैदानात येऊन आमदार बोरकर यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते; मात्र कलम ३९ अ रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्णय वीरेश बोरकर यांनी जाहीर केल्याने आझाद मैदानातील आंदोलन सुरूच राहणार आहे.

आमदार के. सी. वीरेंद्र ‘पप्पी’सह इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बंगळुरू विभागाने २,३०० कोटी रुपयांच्या पप्पी अंदर बाहर बेकायदेशीर आॅनलाईन जुगार घोटाळा प्रकरणी कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी याच्यासह इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. बंगळुरु येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात पृथ्वी एन. राज, केसी थिप्पेस्वामी, मे. फोनपैसा पेमेंट सोल्यूशन्स, गुलशन खट्टर, मे. पप्पीज टुर्स अँड ट्रॅव्हल्स एलएलपी, अर्जुन नागभूषण, अभिजित सज्जन आणि मे. लॉजिकफोर्ज सोल्यूशन्स यांचा समावेश आहे.

जुने गोवा अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

जुने गोवा येथील कदंब बगलमार्गावर सोमवारी रात्री इको व्हॅन व हिरो शायन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला होता. त्यात दुचाकीवर मागे बसलेली मालतीदेवी चौहान (५१ वर्षे, खांडोळा, मूळ उत्तर प्रदेश) हिचा बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बुधवार

आंदोलनावेळी टीसीपी कार्यालयातील फायली गायब

नगरनियोजन खात्याच्या (टीसीपी) कार्यालयात आंदोलनादरम्यान काही फायली गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बर्च क्लब पाडण्याच्या आदेशाला स्थगिती कायम

साकवाडी हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबचे बांधकाम पाडण्याच्या अतिरिक्त पंचायत संचालकांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पुनरीक्षण अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या खटल्याची सुनावणी १३ मार्चपर्यंत तहकूब केली असून तोपर्यंत अतिक्रमण हटाव आदेशावरील तात्पुरती स्थगिती कायम ठेवली आहे.

कोलवाळ कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये भाईगिरीच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत सीमांचल परिदा हा कैदी जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरुवार


वीरेश बोरकर यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता

सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्या ६ दिवसांच्या प्रखर लढ्याला अखेर यश आले आहे. नगरनियोजन कायद्याच्या कलम ३९ (अ) अंतर्गत सांत आंद्रे मतदारसंघातील सर्व तात्पुरते आणि अंतिम जमीन रूपांतरण प्रस्ताव तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आल्याचे अधिकृत पत्र प्रशासनाकडून मिळाल्यानंतर, आमदार बोरकर यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली.

सांकवाळ औद्योगिक वसाहतीत आग

सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील एका पॅकेजिंग युनिटला आग लागून काही प्रमाणात नुकसान झाले. वास्को अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग इतरत्र पसरली नाही. सदर आग कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. तथापि, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.

कोलवाळ कारागृहात हाणामारी; तिघा कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंद

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात सीमांचल परिदा या कैद्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी कैदी नारायण उर्फ बाबू भालेकर, सागर पाटील व मंथन च्यारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

शुक्रवार


बर्च अग्नितांडव प्रकरणी रेडकर, बागरकरला सशर्त जामीन

हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित माजी सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर यांची म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली.

आठ पोलीस अधीक्षकांची बदली

गोवा पोलीस खात्यात हल्लीच बढती झालेल्या आठ अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यात संतोष देसाई यांची दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, तुषार वेर्णेकर यांची पोलीस मुख्यालय तर राजन निगळे यांची दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकात बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी जारी केला आहे.

ज्येष्ठ नागरिकाची ९०.८५ लाखांची फसवणूक

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तसेच जेट एअरवेजचे मालक नरेश गोएल यांच्याशी निगडित मनी लाँड्रिंगचे व्यवहार केल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तिसवाडी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची ९०.८५ लाखांची फसवणूक करण्यात आली.

शनिवार

सिद्धी हळर्णकर, डॉ. शमिला मॉन्तेरो यांना दिलासा

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबला लागलेल्या भीषण आग दुर्घटनेप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सिद्धी हळर्णकर आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सचिव डॉ. शमिला मॉन्तेरो यांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश सरकारने जारी केले असून दोन्ही अधिकाऱ्यांना कार्मिक खात्यात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

युरी आलेमाव यांच्यासह चार आमदारांवर एफआयआर दाखल

मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील घरावर मोर्चा काढल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, वेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांच्यासह १२०० ते १५०० लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

लक्षवेधी

नागरी सेवा अधिकारी सिद्धी हळर्णकर यांची गोवा गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीकडून मिळालेल्या शिफारशीनुसार आणि मुख्य न्यायाधिशांच्या आदेशानुसार, राज्यातील १९ न्यायाधिशांच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्यांची प्रस्तावित यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत ७ जिल्हा न्यायाधीश, ६ वरिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीश आणि ६ कनिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीशांचा समावेश आहे.

वास्को येथील बॅक ऑफ इंडियाच्या शाखेत पहाटे चारच्या दरम्यान एका व्यक्तीने घुसण्यासाठी केलेला प्रयत्न वास्को पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे फसला. याप्रकरणी वास्को पोलिसांनी मूळचा बेळगावचा परंतु सध्या वरुणापुरी-मांगोरहिल येथे राहणारा रायप्पा चन्नाप्पा श्रीरागणवी (५०) याला अटक केली. त्याने बँकेमध्ये चोरी करण्यासाठी आलो असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रार दाखल करूनही गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याच्या प्रकरणी पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर आणि पोलीस निरीक्षक विजय चोडणकर यांना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने (एसपीसीए) नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सुनावणी १२ मार्च रोजी सकाळी होणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बेकायदेशीर रेती उत्खनन संदर्भात नोंदणीकृत नसलेल्या होड्या आढळल्यास जप्त करून कारवाई करण्याचा आदेश आहे. असे असताना काहीच कारवाई होत नसल्यामुळे या संदर्भात दाखल केलेल्या अवमान याचिकेची दखल घेऊन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कॅप्टन आॅफ पोर्टला नोटीस जारी केली आहे. 

हेही वाचा