युरी आलेमाव यांच्यासह चार आमदारांवर एफआयआर दाखल

दोनापावला येथील मंत्र्यांच्या घरावरील मोर्चा प्रकरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
युरी आलेमाव यांच्यासह चार आमदारांवर एफआयआर दाखल

पणजी : मंत्री विश्वजीत राणे (Minister Vishwajit Rane) यांच्या दोनापावला येथील घरावर मोर्चा काढल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (Opposition Leader Yuri Alemao), आमदार कार्लोस फेरेरा (Carlos Alvares Ferreira), वेन्झी व्हिएगस (Venzy Viegas), क्रुझ सिल्वा (Cruz Silva), आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांच्यासह १२०० ते १५०० लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

यामध्ये बेकायदा आंदोलन करणे, मंत्री राणे यांच्या घरावर चालून जाणे, रस्ता बंद करून आठ तास वाहतुकीला अडथळा करणे इत्यादींचा समावेश आहे. मागील शनिवारी आमदार वीरेश बोरकर यांनी सांत आंद्रे मतदारसंघातील कलम ३९ अ नुसार प्रस्तावित झोन बदल रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी पाळे शिरदोन ग्रामस्थांसह खात्याच्या पाटो येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.

यावेळी पोलिसांनी आमदार बोरकर यांना कार्यालयातून बळजबरीने बाहेर काढले होते. यानंतर बोरकर यांनी आपली मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. याला काँग्रेस आणि आपच्या आमदारांनी पाठिंबा दिला होता. 

यानुसार सोमवार २३ फेब्रुवारी रोजी नगर नियोजन कायद्यातील कलम ३९ अ रद्द करण्याबाबत आझाद मैदान ते राणे यांचे निवासस्थान असा मोर्चा काढण्यात आला. आंदोलक अनेक तास राणे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडून बसले होते.

बुधवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा विषय आला होता. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्र्यांच्या घरांवर मोर्चा निर्णय चुकीची असल्याचे सांगितले होते. आंदोलनात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. 

यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्यांना नोटीसा येऊ लागल्या आहेत. यामध्ये त्यांना पणजी पोलीस स्थानक, ताळगाव पोलीस आऊट पोस्ट अथवा दोनापावला पोलीस आउट पोस्ट येथे येऊन भेटण्याचे आदेश नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत.

हेही वाचा