अनिवासी भारतीय आयुक्त अॅड नरेंद्र सावईकर म्हणाले धैर्य बाळगावे..

पणजी: मध्यपूर्व आशियात सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत वास्तव्यास असलेल्या गोमंतकीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, गोव्याचे अनिवासी भारतीय (NRI) आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर यांनी मध्यपूर्वेतील गोमंतकीयांशी संवाद साधला असून नागरिकांनी शांत राहावे आणि धैर्य बाळगावे, असे आवाहन केले आहे. सावईकर यांनी स्पष्ट केले की, जरी अलीकडच्या काळात हल्ले आणि तणाव वाढला असला, तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे.
अनिवासी भारतीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांतील स्थानिक प्रशासने पूर्णपणे सतर्क असून त्यांनी नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तेथील प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, विविध देशांतील भारतीय दूतावासांनीही रहिवाशांसाठी महत्त्वाची नियमावली प्रसिद्ध केली असून गरज पडल्यास तातडीने संपर्क साधण्यास सांगितले आहे. विमान सेवा विस्कळीत झाल्यामुळे आणि उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र सध्या काळजी करण्याचे कारण नसल्याचे सावईकर यांनी अधोरेखित केले आहे.
गोव्याचे अनिवासी भारतीय आयोग या सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मध्यपूर्वेतील कोणत्याही गोमंतकीयाला मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास आयोग त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. कठीण प्रसंगी राज्य सरकार आणि अनिवासी भारतीय आयोग आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी या निवेदनातून दिली आहे. आखाती देशांमध्ये नोकरीनिमित्त असलेल्या हजारो गोमंतकीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने संपर्कात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.