
पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच, इराण सध्या एका अभूतपूर्व नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत आहे. इराणचे दीर्घकाळ सर्वोच्च नेतेपदी राहिलेले अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देशाची धुरा सांभाळण्यासाठी अयातुल्ला अलीरेझा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच अराफी यांचाही एका हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या धक्कादायक दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली असली, तरी इराणी सरकारी प्रसारमाध्यमे किंवा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर इराणमध्ये तातडीने सत्तांतराची प्रक्रिया राबवण्यात आली. इराणच्या संविधानातील कलम १११ नुसार, सर्वोच्च नेत्याच्या अनुपस्थितीत देशाचा कारभार चालवण्यासाठी तीन सदस्यीय अंतरिम परिषद स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेत राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान, मुख्य न्यायाधीश गुलाम हुसेन मोहसेनी-एजेई आणि 'गार्डियन कौन्सिल'चे ज्येष्ठ सदस्य अयातुल्ला अलीरेझा अराफी यांचा समावेश करण्यात आला. जोपर्यंत अलेम्बली ऑफ एक्सपर्ट्सद्वारे कायमस्वरूपी सर्वोच्च नेत्याची निवड होत नाही, तोपर्यंत ही परिषद देशाचे सर्व घटनात्मक अधिकार हाताळणार आहे.
मात्र, अराफी यांच्या नियुक्तीनंतर काही वेळातच रेडिट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या मृत्यूच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. एका हवाई हल्ल्यात अराफी मारले गेल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. सद्यस्थितीत इराण आणि इस्रायलमधील युद्धसदृश परिस्थिती पाहता या बातम्यांकडे गांभीर्याने पाहिले जात असले, तरी अधिकृत सूत्रांच्या अभावी या केवळ अफवा असल्याचे मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अद्याप अराफी यांचा उल्लेख अंतरिम प्रमुख म्हणूनच केला असून त्यांच्या मृत्यूचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.
अयातुल्ला अलीरेझा अराफी हे इराणच्या धार्मिक आणि राजकीय व्यवस्थेतील एक अत्यंत अनुभवी आणि विश्वासू नाव मानले जाते. 'गार्डियन कौन्सिल'चे सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले असून, अशा कठीण काळात देशाला स्थैर्य देण्यासाठी त्यांची निवड महत्त्वाची मानली जात होती. जर त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर इराणसमोर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो आणि देशांतर्गत सत्तासंघर्षाला धार चढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व घडामोडींवर अमेरिका आणि युरोपीय देशांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. इराणमधील या नेतृत्व बदलाचा परिणाम केवळ त्या देशावरच नाही, तर संपूर्ण मध्यपूर्वेच्या सुरक्षेवर आणि जागतिक राजकारणावर होणार आहे. सध्याच्या घडीला इराणमधील परिस्थिती अत्यंत अस्थिर असून, अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा केली जात आहे.