पणजीत पासपोर्ट भवनात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणेची धावपळ

शोधमोहिमेनंतर 'ती' अफवा असल्याचे स्पष्ट

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
पणजीत पासपोर्ट भवनात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणेची धावपळ

पणजी: पणजीतील पाटो येथील 'पासपोर्ट भवन' इमारतीत बॉम्ब असल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने आज सकाळी परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र सखोल तपासणीनंतर हा कॉल केवळ एक अफवा (Hoax) असल्याचे स्पष्ट झाले आहे.



आज सकाळी १०:३९ च्या सुमारास पासपोर्ट भवन इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा कॉल अग्निशमन दलाला प्राप्त झाला. या माहितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत तातडीने रिकामी करण्यात आली आणि परिसराची नाकाबंदी करण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने इमारतीच्या कानाकोपऱ्याची आणि शेजारील 'जीएसआयडीसी' (GSIDC) इमारतीच्या परिसराची कसून तपासणी केली.


बऱ्याच वेळ चाललेल्या या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. अखेर ही धमकी खोटी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी ही अफवा असल्याचे जाहीर केले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. शोधमोहिमेनंतर इमारतीतील व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले आहेत.


दरम्यान, हा ईमेल कोणी पाठवला, याचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या अज्ञात व्यक्तीचा माग काढण्यासाठी पोलीस तांत्रिक तपास करत आहेत.


हेही वाचा