
मडगाव: रावणफोंड येथील रेल्वे पुलाजवळ सुरू असलेल्या चारपदरी रस्ता आणि पुलाच्या कामादरम्यान सोमवारी साळावली प्रकल्पातून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जेसीबीचा धक्का लागून फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. या प्रकारामुळे परिसरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
पॉवर हाऊस ते रावणफोंड सर्कलपर्यंतच्या चारपदरी रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. सध्या रावणफोंड सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून, सोमवारी सकाळी रस्त्याच्या बाजूला मातीचा भराव टाकत असताना जेसीबीने ही जलवाहिनी फोडली. साळावली येथील जलप्रकल्पातून होणारा हा मुख्य पुरवठा असल्याने जलवाहिनी फुटताच मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली.
विशेष म्हणजे, एवढी मोठी घटना घडूनही जलस्रोत किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे कोणतेही अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले नाहीत. प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही मुख्य जलवाहिनी असल्याने आता नावेली आणि मडगाव शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.