केले फोंडा पालिकेच्या ई-लायब्ररीचे उद्घाटन

पणजी: गोव्यातील वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाचकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यामध्ये १६८ नवीन वाचनालये स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ही वाचनालये राज्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये उभारली जाणार असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आतापर्यंत २० वाचनालये कार्यान्वित देखील झाली आहेत. तळागाळातील नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि ज्ञानाची दारे उघडी करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंडा पालिकेच्या ई-लायब्ररीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी संवाद साधला.
या प्रकल्पासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपापल्या भागातील वाचनालयांचा विकास आणि त्यांची योग्य देखभाल करण्याची जबाबदारी या संस्थांकडे सोपवण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर वाचनालयांचे जाळे विणल्यास युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. केवळ पुस्तके उपलब्ध करून देणे एवढ्यावरच मर्यादित न राहता, एक समृद्ध वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
भौतिक वाचनालयांसोबतच गोव्याला डिजिटल क्रांतीशी जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 'ई-लायब्ररी' (E-library) प्रकल्पाचीही घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या विशेष अनुदानातून हा प्रकल्प संपूर्ण राज्यभरात राबवला जाणार आहे. या डिजिटल ग्रंथालयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आणि वाचकांना दुर्मिळ पुस्तके तसेच शैक्षणिक संसाधने एका क्लिकवर उपलब्ध होतील. ऑनलाइन माध्यमातून शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल.
शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत दर्जेदार ग्रंथालय सेवा पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. डिजिटल आणि प्रत्यक्ष ग्रंथालयांच्या संगमातून गोव्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.