‘३९ अ’ अंतर्गत झोन बदल : पाळोळेतील एकाच सर्व्हे क्रमांकात ४.१४ लाख चौ.मी. जमीन रूपांतरित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सांत आंद्रे मतदारसंघातील पाळे-शिरदोन ग्रामस्थांनी आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारून नगरनियोजन कायद्याचे वादग्रस्त कलम ‘३९ (अ)’ मतदारसंघपुरते मागे घेण्यास भाग पाडले. या पार्श्वभूमीवर २२ मे २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या नऊ महिन्यांत सुमारे १३.८६ लाख चौ.मी. जमीन रूपांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात नगर्से-पाळोळे येथील एकाच सर्व्हे क्रमांकातील ४.१४ लाख चौ.मी. जमीन रूपांतर केली आहे. याशिवाय एल्ला (ओल्ड गोवा), कोरगाव, मंडूर, पार्से, लाटंबार्से, थिवी, सांकवाळ येथील ५० हजारांहून अधिक चौ.मी. जमीन रूपांतर केली आहे.
जमिनीचा वापर बदलण्यासाठी प्रादेशिक आराखड्याची प्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. त्यात सार्वजनिक हरकती, आक्षेपांची सुनावणी पूर्ण करावी लागत होती. याला पळवाट म्हणून नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करून ‘३९ अ’ कलम जोडण्यात आले. हे कलम २०२४ मध्ये विधानसभेत मंजूर झाले. या कलमाअंतर्गत सरकारला सार्वजनिक हित किंवा विशेष कारणांसाठी थेट निर्णय घेण्याची मोकळीक मिळाली. छोट्या जमिनीवर घर बांधणे किंवा स्थानिक विकासासाठी लवचिकता देणे हा मूळ उद्देश होता. मात्र या कलमाचा दुरुपयोग होत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी आंदोलन उभारले. याचाच भाग म्हणून डोंगर कापणी आणि बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासह पर्यावरण व संस्कृतीचे जतन करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली लोकचळवळ सुरू झाली. याच दरम्यान आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारून कलम ‘३९ (अ)’ मतदारसंघापुरते रद्द करण्यास भाग पाडले.
कलम ‘३९ (अ)’ अंतर्गत राज्यात वरील कालावधीत १६८ अर्ज मंजूर झाले आहेत. त्यात सुमारे १३ लाख ८६ हजार ०८५ चौ.मी. जमीन रूपांतर करण्यात आली. यात सर्वाधिक नगर्से पाळोले येथील सर्व्हे क्रमांक २८५/३, २८७/१, आणि २८७/२ मधील ४ लाख १४ हजार ४३६ चौ.मी. जमीन रूपांतर करण्यात आली. एल्ला येथील सर्व्हे क्रमांक ६८/१ सी मधील १ लाख ६४ हजार ०४५ चौ.मी., कोरगाव येथील सर्व्हे क्रमांक २३७/० ९२ हजार १७५ चौ.मी., मंडूर येथील सर्व्हे क्रमांक ५९/१ ए मधील ७४ हजार ०५३ चौ.मी., लाटंबार्से येथील सर्व्हे क्रमांक ४२०/० मधील सुमारे ७० हजार चौ.मी., थिवी येथील सर्व्हे क्रमांक ५०१/१ ए मधील ५२ हजार ९०० चौ.मी., थिवी येथील सर्व्हे क्रमांक ५०३/१ ए(४) मधील ५० हजार चौ.मी. जमीन रूपांतर करण्यात आली आहे.