११ नगरपालिकांची निवडणूक होणार एप्रिलमध्ये

प्रभाग फेररचनेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती


3 hours ago
११ नगरपालिकांची निवडणूक होणार एप्रिलमध्ये

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील ११ नगरपालिकांची निवडणूक एप्रिलमध्ये होणार आहे. ११ नगरपालिकांच्या प्रभाग फेररचनेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पेडणे, डिचोली, म्हापसा, वाळपई, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, कुडचडे-काकोडा, काणकोण आणि सांगे या ११ नगरपालिकांची निवडणूक एकाचवेळी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.
पणजी महापालिकेची निवडणूक ११ मार्चला होत आहे. एप्रिलमध्ये ११ नगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण होतो. त्यामुळे एप्रिलपर्यंत निवडणूक होईल. साखळी आणि फोंडा या दोन नगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. त्यामुळे साखळी आणि फोंडा नगरपालिकासोडून अन्य ११ नगरपालिकांची निवडणूक एप्रिलमध्ये होईल. प्रभाग फेररचनेचा आदेश जारी झाला आहे. ज्या तालुक्यात नगरपालिका येतात, त्या तालुक्याचा उपजिल्हाधिकारी हा निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ), तर मामलेदार साहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (एईआरओ) असेल. त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी झाला आहे. प्रभागातील मतदार तसेच सीमा निश्चित झाल्यानंतर त्या विषयीची अधिसूचना जारी होईल. त्यानंतर प्रत्येक पालिकेसाठी आरक्षणाची अधिसूचना जारी होईल. मार्च महिन्यातच ११ पालिकांच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे.
म्हापसा, मुरगाव, मडगाव, केपे आणि सांगे या नगरपालिकांची निवडणूक २३ एप्रिल २०२१ राेजी झाली होती. त्यामुळे या नगरपालिकांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. पेडणे, डिचोली, वाळपई, कुंकळ्ळी, काणकोण, कुडचडे-काकोडा या पालिकांची निवडणूक २० मार्च रोजी झाली होती. या पालिकांचा कार्यकाळ लवकर पूर्ण होत असल्याने या पालिकांवर काही दिवस प्रशासक नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे.
फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूकही एप्रिलमध्येच शक्य

फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूकही एप्रिलमध्येच होणार आहे. मात्र त्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा मात्र राज्य निवडणूक आयोग करेल.