ग्रामसभेत बेकायदेशीर बांधकामांच्या मुद्द्यांवरून जोरदार वादंग

वेर्ला-काणका ग्रामसभेत बेकायदेशीर बांधकामावरून पंचायत मंडळाला जाब विचारताना संतप्त ग्रामस्थ. (आग्नेलो परेरा)
म्हापसा : पंचायत सचिवांनी ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात सादर केलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर विचार करण्यास नकार दिल्यानंतर वेर्ला-काणका ग्रामसभेत गोंधळ उडाला. यामुळे बैठक वादळी झाली.
रहिवाशांनी आरोप केला की, पंचायतीने बैठकीचे इतिवृत्त नोंदवण्यास नकार दिला आणि लोकांनी उपस्थित केलेले अनेक मुद्दे नाकारले, ज्यात कचरा व्यवस्थापन, झोपड्या आणि गावातील कथित बेकायदेशीर बांधकामांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता.
अनेक रहिवाशांनी या भागात ‘बेकायदेशीर बांधकामे असल्याचे वर्णन’ केलेल्या विषयावर औपचारिकपणे चर्चा करण्याची मागणी केली होती. तसेच पंचायतीने केलेल्या कारवाईवर पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. या संदर्भात आलेलेल्या तक्रारींची संख्या, कारणे दाखवा नोटीस आणि पंचायतीने केलेल्या तपासणीची माहिती स्थानिकांनी मागितली. मात्र, पंचायत सचिवांनी बेकायदेशीर बांधकामांवर कोणत्याही चर्चेला परवानगी देण्यास नकार दिला. या निर्णयामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली.
सभेतील या प्रचंड तणावामुळे इतर विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. अखेर, २१ मार्च रोजी केवळ पंचायत बजेटवर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्याचा एकमेव ठराव या गोंधळात मंजूर करण्यात आला.
ग्रामस्थांचा संताप
आम्ही आमचे प्रस्ताव रीतसर लेखी स्वरूपात दिले असतानाही जर ग्रामसभेत त्यावर चर्चा होणार नसेल, तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठे?" असा संतप्त सवाल एका ग्रामस्थाने उपस्थित केला. या गोंधळातच ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरले आणि सचिवांच्या अडेलतट्टू भूमिकेबाबत जाब विचारला. पंचायतीने सभेचे इतिवृत्त योग्य प्रकारे नोंदवण्यासही नकार दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.