ग्रामसभेत मागणी : हॉटमिक्स प्रकल्पामुळे दुर्गंधीवर उपाययाेजना करा

ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करताना ग्रामस्थ.
फोंडा : मोले पंचायतीची ग्रामसभा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरून गाजली. कर्नाटकातून होणारी कथित बेकायदेशीर वाहतूक, धाट फार्मचे स्थलांतर व पुनरारंभ, सांगोड येथील हॉटमिक्स प्रकल्पामुळे निर्माण झालेली दुर्गंधी तसेच अन्य स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेत धाट फार्म पुन्हा सुरू करण्यासह काही महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
ग्रामस्थांनी मोले गेटमार्गे येणाऱ्या वाहनांची पुरेशी तपासणी होत नसल्याचा आरोप केला. कर्नाटकातून गोमांसाची वाहतूक होत असल्याची शंका व्यक्त करत यावर लक्ष ठेवण्याची मागणी पंचायत मंडळाकडे करण्यात आली. संबंधित यंत्रणांनी अधिक कडक तपासणी करावी, अशी मागणी ग्रामसभेत झाली.
सरकारने धाट फार्मचे स्थलांतर कोपार्डे येथे केल्यानंतर जुना फार्म बंद आहे. सध्या त्या ठिकाणी कुंपण बांधण्याचे काम सुरू असून, फार्म परिसरात गैरप्रकार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. अंदाजे ६० वर्षांपासून कार्यरत असलेल्या या फार्ममुळे स्थानिकांना रोजगार मिळत होता. त्यामुळे धाट फार्म पुन्हा सुरू करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.
हॉटमिक्स प्रकल्पावर आक्षेप
सांगोड भागात सुरू असलेल्या हॉटमिक्स प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. पंचायत मंडळाने तातडीने पाहणी करून कंत्राटदाराशी चर्चा करावी, असा निर्णय घेण्यात आला.
पार्सेकर फूड्सविरोधातील तक्रारी
पळसकटा-मोले येथील पार्सेकर फूड्स या आस्थापनाविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करावा, तसेच भविष्यात कोणतीही नवीन परवानगी देऊ नये, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. ग्रामसभा सरपंच विठोबा मेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. धाट फार्म पुन्हा सुरू करणे आणि सांगोड येथील हॉटमिक्स प्रकल्पाची पाहणी करणे हे प्रमुख निर्णय ग्रामसभेत घेण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले.