सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी

पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अल्प व्याजदरात घरकर्ज देणारी योजना आगामी अर्थसंकल्पात जाहीर करावी, अशी मागणी अखिल गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना तातडीने बढती द्यावी आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या बढत्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
अखिल गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मागण्या मांडल्या.
स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात घरकर्ज देण्याची योजना पूर्वी अस्तित्वात होती; मात्र सरकारने त्यामध्ये बदल केला आहे. पूर्वीचीच योजना पुन्हा सुरू करण्यात यावी आणि येत्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा करावी, अशी मागणी अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी केली.
पात्र कर्मचाऱ्यांना बढती द्यावी!
नोकरभरतीसाठी सरकारने कर्मचारी भरती आयोगाची स्थापना केली असून भरती आयोगामार्फत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय संघटनेने स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. मात्र, अनेक पात्र कर्मचाऱ्यांना अद्याप बढती मिळालेली नाही. बढतीची प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित आहे. अधिकाऱ्यांना सेवावाढ देणे थांबवून पात्र कर्मचाऱ्यांना बढती द्यावी. बढती का दिली जात नाही याची न्यायालयीन आयोगामार्फत चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.