यापुढे शेतजमिनींमध्ये भंगार अड्ड्यांना वाव नाही

मुख्यमंत्री : सुर्ल साखळी येथे शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण


3 hours ago
यापुढे शेतजमिनींमध्ये भंगार अड्ड्यांना वाव नाही

सुर्ल साखळी येथे पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुंदर नाईक, संदीप फळदेसाई व इतर.
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : गोव्याची कृषी क्षेत्रात प्रगती होत आहे. सामूहिक शेतीला मोठा प्रतिसाद मिळत असून कुडणे, न्हावेली, सुर्ल, मेणकुरे आदी गावांत सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहे. शेतजमिनी पडिक न ठेवता लागवडीखाली आणाव्यात. अर्थसंकल्पात सरकार कृषी खाते व सामाजिक शेती पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा आधार देणार आहे. शेतजमिनींमध्ये यापुढे भंगार अड्ड्यांना थारा दिला जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सुर्ल साखळी येथील श्री नारायण देवाच्या प्रांगणात कृषी संचालनालयातर्फे ‘सामूहिक शेती प्रकल्प व शेतकरी गौरव सोहळा २०२६’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर कृषी संचालक संदीप फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, सरपंच सुचिता गावकर, शेतकरी विश्वंभर गावस, वरद सामंत व इतर उपस्थित होते. यावेळी सामूहिक व प्रगत शेती करणाऱ्या ४२ शेतकऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
शेतकऱ्यांनी एकत्रित शेती केल्यास मोठ्या प्रमाणात जमीन लागवडीखाली येईल. कृषी अधिकारी शेतात उतरून मार्गदर्शन करत आहेत. कुळांनी शेती करावी. कोमुनिदाद जागेतील जमीनही लागवडीखाली आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेती करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात येत असल्याने कृषी क्षेत्रात २०३७ पर्यंत आम्ही स्वयंपूर्ण होऊ. एकत्रित शेतीचे महत्त्व लक्षात आल्याने अनेक ठिकाणी शेतीबरोबरच फलोत्पादन, फूल, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय असे जोडधंदेही केले जात आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शेतजमीन पडिक ठेवण्यापेक्षा ती सामूहिक शेतीसाठी करार करून द्यावी. शेतीमध्ये कचरा वा भंगार अड्ड्यांना जागा देणे योग्य नाही. भंगार अड्ड्यांना जागा देऊन शेतजमीन नापीक बनविण्याचे पाप डोक्यावर घेत आहात, हे लक्षात ठेवा. यापुढे शेतजमिनींमध्ये भंगार अड्डे सुरू करायला सरकार परवानगी दिली जाणार नाही.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री