सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : तीन महिन्यांत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश

पणजी : गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ग्राहकांना वेळेत न्याय मिळावा यासाठी उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाची दोन आठवड्यांत अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे आणि प्रलंबित प्रकरणांचा तीन महिन्यांत निकाल लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
उत्तर प्रदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वेतन व भत्त्यांबाबतच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांतील आयोगांमधील प्रलंबित स्थितीचीही स्वतःहून दखल घेतली, ज्यामध्ये गोव्याचाही समावेश होता.
| विषय | न्यायालयाचे आदेश |
|---|---|
| अध्यक्ष नियुक्ती | उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाची २ आठवड्यांच्या आत नियुक्ती करणे. |
| प्रलंबित प्रकरणे निकाल | पुढील ३ महिन्यांच्या आत सर्व प्रकरणांचा निकाल लावणे बंधनकारक. |
| कागदपत्रे हस्तांतरण | २ आठवड्यांच्या आत सर्व कागदपत्रे उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे सोपवणे. |
आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारण प्रक्रियेला मोठा फटका बसत असल्याची नोंद न्यायालयाने घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आता एका न्यायाधीशांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतील. ही नियुक्ती झाल्यानंतर विद्यमान तांत्रिक सदस्यांच्या सहकार्याने प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढली जातील.