टीसीपी अधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा

बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. (कैलास नाईक)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नगरनियोजन खात्याच्या (टीसीपी) कार्यालयात आंदोलनादरम्यान काही फायली गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक आणि त्यानंतर सुकाणू समितीची बैठक पार पडली. बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या घरावर मोर्चा नेऊन दगडफेक आणि घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणाले, आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र आंदोलन लोकशाही मार्गानेच व्हायला हवे. कायदा हातात घेणाऱ्यांना सूट दिली जाणार नाही. मोर्चादरम्यान आंदोलकांनी मंत्र्यांच्या घराबाहेर दगडफेक केली आणि अपशब्द वापरले. अशा प्रकारांचे समर्थन होऊ शकत नाही.
टीसीपी कार्यालयात रात्री ठाण मांडणे चुकीचे
नगरनियोजन खात्याच्या कार्यालयात आंदोलकांनी रात्रभर ठाण मांडणे हा गंभीर आणि अयोग्य प्रकार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलनासाठी आझाद मैदान हेच योग्य ठिकाण आहे. सरकारी कार्यालयाबाहेर रात्री थांबण्याची परवानगी कोणालाही नसते. कार्यालयात महिला कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. आंदोलनावेळी फायली गायब झाल्याची तक्रार एका अधिकाऱ्याने पणजी पोलिसांत दाखल केली आहे. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार वीरेश बोरकर यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.