‘एमडी’ संजय सोनी बहरीन किंगडमचा वाणिज्यदूत

पणजी : दारूगोळा बेकायदेशीरपणे आयात केल्या प्रकरणात वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक संजय वेद्राक्ष सोनी याच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. सोनी हा बंगळुरू येथील बहरीन किंगडमचा वाणिज्यदूत असल्यामुळे त्याच्या विरोधात केलेल्या कारवाईची माहिती गृह खात्याने केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली आहे.
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा विभागाला वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ ही कंपनी विदेशातून बेकायदेशीररीत्या दारूगोळा आयात करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, डीआरआयने ‘ह्युज प्रेसिझन’ या कंपनीने दाबोळी विमानतळावर उतरवलेल्या मालाची तपासणी केली. त्यावेळी कंपनीने २ नोव्हेंबर रोजी १८ लाख ३२ हजार ५०६ रुपये किमतीचा माल आयात केल्याचे समोर आले. तर कंपनीने ७ जून २०२५ रोजी ९२ लाख ८३ हजार ४५९ रुपये माल आयात करून कंपनीत साठवून ठेवल्याचे समोर आले. हा माल जप्त करण्यात आला होता.
या संदर्भात कंपनीच्या अधिकार्यांची चौकशी केली असता, त्यांनी डीआरआयकडे बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच बनावट ई मेल्स सादर करून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच डीआरआयने गुन्हा नोंदवून १९ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय वेद्राक्ष सोनी आणि लॉजिस्टिक्स मॅनेजर जयेश पांडुरंग शेट्ये यांना अटक केली. त्यांची पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. या आदेशाला डीआरआयने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने संशयितांचा जामीन रद्द करून त्यांना शरण येण्याचा आदेश दिला होता. शरण न येता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याच दरम्यान दोघांनी आव्हान मागे घेतले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर ३ डिसेंबर २०२५ रोजी डीआरआयने त्या दोघांना अटक केली.
त्या दोघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत असताना सशर्त जामिनावर सुटका केली. या संदर्भात डीआरआयने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि गृह खात्याकडे सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, सोनी बंगळुरु येथील बहरीन किंगडमचा वाणिज्यदूत असल्यामुळे त्याच्या विरोधात केलेल्या कारवाईची माहिती गृह खात्याने केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दिली आहे.
१,११,१५,९६५ रुपयांचा माल केला होता जप्त
तपासणीदरम्यान कंपनीने २ नोव्हेंबर रोजी १८,३२,५०६ रुपये किमतीचा माल आयात केल्याचे समोर आले. तसेच ७ जून २०२५ रोजी ९२,८३,४५९ रुपये किमतीचा माल आयात करून कंपनीत साठवून ठेवल्याचे आढळले. त्यानुसार, एकूण १,११,१५,९६५ रुपये किमतीचे दोन मोठे कन्साइनमेंट्स डीआरआयने जप्त केले.