डॉ. स्नेहा पोकळे : सर्वाधिक ७१.२ टक्के कॉल्स १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींकडून

पणजी : मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘टेली मानस’ या हेल्प लाईन सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेवेला आलेल्या एकूण कॉलपैकी सर्वाधिक कॉल्स हे करिअरबाबत खात्री नसणे, नातेसंबंधातील तणाव, आर्थिक अस्थैर्य, कामाच्या ठिकाणावरील तणाव आदी समस्यांच्या संबंधित होते. या सेवेला सर्वाधिक म्हणजेच ७१.२ टक्के कॉल्स हे १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींनी केले आहेत. टेली मानस विभागाच्या वरिष्ठ मानसोपचरतज्ज्ञ सल्लागार डॉ. स्नेहा पोकळे यांनी ही माहिती दिली.
राज्यात १५ मे २०२३ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान या सेवेला २६ हजार ६५१ कॉल्स आले होते. एकूण कॉलपैकी सर्वाधिक १८ हजार ९७५ कॉल्स हे १८ ते ४५ वर्षे वयोगटातील होते. त्यानंतर ३,१७१ कॉल्स हे ४६ ते ६४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे होते. २,९०५ कॉल्स हे १३ ते १७ या वयोगटातील या पौगंडावस्थेतील मुलांचे होते. ७७३ कॉल्स हे १२ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांचे, तर ८२७ कॉल्स हे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे होते. ५ ते १७ वर्षे वयोगटातील कॉल्स हे प्रामुख्याने शैक्षणिक दबाव, परीक्षेचा ताण, समाजात नाकारले जाण्याची भीती, समाज माध्यमांनी तयार केलेल्या शारीरिक प्रतिमेसंबंधित समस्यांसाठी होते.
या गटातील कॉल करणाऱ्यांमध्ये सतत मूड बदलणे, समाजात न मिसळणे, लक्ष केंद्रित न करता येणे अशी काही लक्षणे आढळली होती. १८ ते ४५ वयोगटातील कॉल्समध्ये सतत नैराश्य, झोप न येणे, पॅनिक अटॅक अशी लक्षणे आढळली. याशिवाय ४५ ते ६४ वर्षे वयोगटातून वैवाहिक समस्या, कामाचा ताण, मेनोपॉज व अन्य शारीरिक समस्यांसाठी कॉल्स करण्यात आले. या कॉलमध्ये अंगदुखी, अति विचार करणे, अस्वस्थता, निराशा अशी लक्षणे दिसली. तर ज्येष्ठ नागरिकांनी जीवनसाथीचा मृत्यू, एकाकीपणा, शारीरिक समस्या यासाठी कॉल केले होते. या सेवेमध्ये लोकांना फोन अथवा प्रत्यक्ष भेटून समुपदेशन दिले जाते.
समुपदेशनातून रुग्णांना मोठा दिलासा
डॉ. स्नेहा पोकळे यांनी सांगितले की, भावनिक त्रास, चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्या असणाऱ्यांना समुपदेशन सेवांचा फायदा होत आहे. या सेवेद्वारे विशेष मानसोपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना आयपीएचबीमध्ये रेफर केले जात आहे. यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार होत आहेत. जागृती उपक्रमांमुळे मानसिक आरोग्याविषयीचा गैरसमज कमी झाला आहे. त्यामुळे लोक भीती किंवा लाज न बाळगता मदत घेण्यास पुढे येत आहेत.

‘टेली मानस’ हेल्पलाईनची वैशिष्ट्ये
* फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
* गंभीर रुग्णांना त्वरित इस्पितळात दाखल करण्याची सोय.
* समस्या मांडणाऱ्या व्यक्तीची माहिती पूर्णपणे गुप्त राखली जाते.