नियमांचे पालन करण्याचे पणजी शिगमोत्सव समितीतर्फे आवाहन!

पणजी : येथील पणजी शिगमोत्सव समितीतर्फे ३ ते ८ मार्च दरम्यान ३७ व्या शिगमोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत ३ मार्च रोजी आझाद मैदानावर गुलालोत्सव साजरा केला जाईल, तर ७ मार्च रोजी जुने सचिवालय ते कांपाल मैदान या मार्गावर भव्य चित्ररथ मिरवणूक निघणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी दिली. सोमवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शांताराम नाईक, मंगलदास नाईक आणि किशोर नार्वेकर उपस्थित होते.
धेंपो यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना स्पष्ट केले की, ३ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पारंपरिक रोमटामेळ आझाद मैदानावर पोहोचेल आणि त्यानंतर तिथे रंगोत्सव साजरा होईल. ४ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता आझाद मैदानावर संगीताचा कार्यक्रम होईल. त्यानंतर ५ मार्च रोजी 'सिद्धकला', ६ मार्च रोजी 'सुरसंगम', ७ मार्च रोजी 'दोन यो घर तुमचेच' हे एकांकी कोकणी नाटक आणि ८ मार्च रोजी 'लावण्यखणी' या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम आझाद मैदानावर पार पडतील.
पर्यटन खात्याने यंदा मिरवणूक वेळेत संपवण्याच्या सूचना दिल्या असून, रोमटामेळ रात्री १२ वाजेपर्यंत संपवणे बंधनकारक आहे. मिरवणुकीत शिस्त राखण्यासाठी यंदा एका रोमटामेळमध्ये कमाल १५० जणांनाच परवानगी दिली जाईल. सहभागी होणाऱ्या रोमटामेळांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुकांनी ४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत समितीच्या पणजी कार्यालयात उपस्थित राहावे; कोणालाही 'स्पॉट एन्ट्री' दिली जाणार नाही, असेही धेंपो यांनी स्पष्ट केले.
यंदा १०.५७ लाखांची बक्षिसे
या शिगमोत्सवात विविध श्रेणींमध्ये एकूण १०.५७ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये चित्ररथांसाठी ५.३५ लाख, रोमटामेळसाठी ३.९५ लाख, लोकनृत्यासाठी १.२८ लाख आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी ६९,५०० रुपयांच्या बक्षिसांचा समावेश आहे.
चौघांचा विशेष सन्मान
यंदा समितीतर्फे उमकांत वाडकर, सुरेंद्र वळवईकर, मॅक्सी परेरा आणि अवधूत आंगले या मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. शिगमोत्सव समितीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, लवकरच या संकेतस्थळावर जमा-खर्चाची माहितीही अपलोड केली जाईल, असे धेंपो यांनी सांगितले.