नेतन्याहूंच्या कार्यालयावर हल्ल्याचा इराणचा दावा

इस्रायलने दावा फेटाळला : इस्रायलकडून इराणचे वरिष्ठ अधिकारी लक्ष्य : शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १८० विद्यार्थिनींचा मृत्यू : इराणच्या ड्रोन हल्ल्यात सौदी अरेबियातील रिफायनरीला आग


2 hours ago
नेतन्याहूंच्या कार्यालयावर हल्ल्याचा इराणचा दावा

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये उठलेल्या ज्वाळा आणि धुराचे लोट.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
तेल अवीव : इस्रायलची राजधानी तेल अवीवमधील पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा इराणने केला. हैफा व पूर्व जेरुसलेममधील सुरक्षा स्थळांसह इस्रायली सरकारी व लष्करी कार्यालयांवर हल्ला केल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) केला. मात्र, इस्रालयने पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा दावा फेटाळला. दोन्ही बाजूंकडून क्षेपणास्त्र, ड्रोन, एअरस्ट्राईक आणि बाॅम्बवर्षाव सुरूच राहिले.


सोमवारी इराणने मध्यपूर्वेतील चार देशांमधील सहा अमेरिकन तळांवर जोरदार हल्ले केले. इराणचे सर्वोच्च नेते खामनेई हल्ल्यात मारले गेल्यानंतर इस्रायलने आता इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात इस्रायल व्यवहार विभागाचे उपगुप्तचर मंत्री सय्यद याह्या हमीदी, हेरगिरी विभागाचे प्रमुख जलाल पूर हुसेन मारले गेले. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’च्या सुरुवातीच्या हल्ल्यात त्यांना लक्ष्य करण्यात आले. इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात खात्मा झाला. इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील मंत्रालयाच्या मुख्यालयावरही हल्ला केला.


अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे १,००० हून अधिक इराणी तळांवर हल्ला केला. आतापर्यंत ५५५ लोक मृत्युमुखी पडले असून ७०० हून अधिक जखमी झाले आहेत. एका शाळेवर क्षेपणास्त्राचा हल्ला झाला. यामध्ये १८० विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि ४५ जण जखमी झाले. इस्रायलने प्रथमच आयर्न बीम नावाची नवीन लेसर संरक्षण प्रणाली वापरली. हिजबुल्लाहने हवेत डागलेले रॉकेट त्यांनी रोखले. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देशाचे कार्यवाहक संरक्षणमंत्री म्हणून रिव्होल्युशनरी गार्ड्स जनरल माजिद अबनेलरेझा यांची नियुक्ती केली आहे. अलिकडच्या हल्ल्यात माजी संरक्षणमंत्री ठार झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ओमानच्या आखातात बॉम्बने भरलेल्या ड्रोन बोटीने एका तेल टँकरवर हल्ला केला. यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला.
ट्रम्प ब्रिटनच्या पंतप्रधानांवर नाराज
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी हिंद महासागरात असलेले त्यांचे लष्करी तळ डिएगो गार्सिया अमेरिकेला सोपवण्यास विलंब केला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेला या तळावरून इराणवर हल्ला करायचा होता. ब्रिटनने ४८ तासांनंतर परवानगी दिली आणि अट घातली की, अमेरिकेला येथून फक्त इराणी क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करता येईल. याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधानांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कुवेतने चुकून पाडली अमेरिकेची लढाऊ विमाने
अमेरिकेची तीन ‘एफ-१५ई’ लढाऊ विमाने कुवेतच्या हवाई संरक्षण दलाने सोमवारी चुकून पाडली. ही घटना ‘फ्रेंडली फायर’असल्याचे अमेरिकन लष्कराने स्पष्ट केले. इराणमध्ये सुरू असलेल्या लष्करी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ही विमाने उड्डाण करत होती. तीन लढाऊ विमाने कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमने चुकून पाडली. हा प्रकार तांत्रिक गोंधळातून किंवा त्रुटीमुळे झाला. विमानातील सहाही कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुवेतने या दुर्घटनेची कबुली दिली असून, या प्रकरणाच्या कारणांचा तपास सुरू आहे.
सौदी अरेबियात इराणचा ड्रोन हल्ला
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचे पडसाद थेट सौदी अरेबियातील अरामको रिफायनरी कंपनीपर्यंत पोहोचले आहेत. सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी असलेल्या अरामकोवर ड्रोन हल्ला करण्यात आला. अरामको ही जगातील सर्वांत मोठी रिफायनरी आहे. ड्रोन हल्ला केल्यामुळे कंपनीला आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत होते.
खामनेई यांच्या मृत्यूनंतर निषेध, निदर्शने सुरूच
जम्मू-काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी निषेध निदर्शने करण्यात आली. श्रीनगरमधील बेमिना परिसरात सुरक्षा दलांनी निदर्शकांवर लाठीमार केला आणि अश्रुधुराचा वापर केला. शोपियान, बारामुल्ला, बांदीपोरा येथे लोकांनी बाजारपेठा बंद ठेवल्या.
पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये हिंसक निदर्शने झाली. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये आंदोलकांनी युनायटेड नेशन्सच्या कार्यालयांना आग लावली. यात गिलगिटमधील युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या कार्यालयाचाही समावेश आहे.
स्कर्दूमध्ये पोलीस अधीक्षकांचे कार्यालय आणि अनेक सरकारी इमारतींना आग लावण्यात आली. आंदोलकांवर गोळीबार केल्यामुळे ७ आंदोलक ठार झाले, तर १२ हून अधिक जखमी झाले.
चौथ्या अमेरिकन सैनिकाचा मृत्यू
युद्धात सोमवारी एका अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने सांगितले की, चौथा सैनिक सुरुवातीच्या इराणी हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. रविवारी तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत या संघर्षात चार अमेरिकन सैनिकांनी प्राण गमावले आहेत.
इराणचे अंतरिम प्रमुख अराफींच्या मृत्यूची चर्चा!
इराणचे दीर्घकाळ सर्वोच्च नेतेपदी राहिलेले अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अलीरेझा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच अराफी यांचाही एका हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. इराणी सरकारी प्रसारमाध्यमे किंवा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. अराफी हे धार्मिक आणि राजकीय व्यवस्थेतील अत्यंत अनुभवी आणि विश्वासू आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर इराणसमोर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो आणि देशांतर्गत सत्तासंघर्षाला धार चढण्याची शक्यता आहे.