एनडीपीएस न्यायालयाचा निर्णय : कोकेन बाळगल्याचा होता आरोप

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कोकेन बाळगल्याबद्दल इस्रायली ड्रग्ज तस्कर डेव्हिड ड्रिहम ऊर्फ डुडू याच्याविरुद्ध मेरशी येथील विशेष (एनडीपीएस) न्यायालयाने आरोप निश्चित केला आहे. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी दिला.
या प्रकरणी केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने गुन्हा दाखल केला होता. गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीवरून एनसीबीचे उपसंचालक नितीन गवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन निरीक्षक फ्रान्सिको झेवियर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ जून २०२५ रोजी हणजूण परिसरात छापा टाकला होता. पथकाला डुडूकडे ११ ग्रॅम कोकेन सापडला होता. एनसीबीचे तत्कालीन निरीक्षक झेवियर यांनी डुडूविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम ८ सी अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. ४ जून २०२५ रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने डुडूला सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणी एनसीबीने १ डिसेंबर २०२५ रोजी मेरशी येथील एनडीपीएस न्यायालयात डुडूविरोधात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात एनसीबीतर्फे विशेष अभियोक्ता समीर ताळगावकर यांनी बाजू मांडली. त्यांनी डुडूविरोधात दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. त्याच्याकडून कोकेन जप्त केलेल्याचे पुरावे सादर केले. न्यायालयाने डुडूविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून आरोप निश्चित केला. पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार आहे.
डुडूला २०१० मध्ये झाली होती अटक
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) २१ फेब्रुवारी २०१० रोजी हणजूण येथील सेंट अॅन्थनी चॅपेलजवळ छापा टाकून डुडूला अटक केली होती. त्याच्याकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचे ४.४ ग्रॅम हेरॉईन, ५.३४ ग्रॅम कोकेन, ४.३१ ग्रॅम लिक्विड एलएसडी, १.१६ किलो चरस जप्त केले होते. एएनसीने डुडूला अटक केली होती. यात पोलीस अधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्या नातेवाईकांवरही आरोप झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने डुडूला निर्दोष मुक्त केले होते. एएनसीच्या पथकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईचे निर्देश दिले होते. २०१९ मध्ये हणजूण येथे एका जेस्की कामगारावर सुरीहल्ला केल्याप्रकरणात डुडूची पुराव्याअभावी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती.